गळा चिरून मजूराला जीवे मारण्याचा प्रयत्न

नाणेकरवाडीतील घटना : तीन अज्ञात हल्लेखोरांनावर गुन्हा दाखल

वाकी – तीन अज्ञात हल्लेखोरांनी अज्ञात कारणावरून 45 वर्षीय मजुरास जीवे मारण्याच्या उद्देशाने मजुराचा धारदार हत्याराने गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीतील नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 27 ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मजुराची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर चाकण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी येथील पोलिसांनी या प्रकारा नंतर घटना स्थळावरून फरारी झालेल्या तीन अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध आज (बुधवारी) गुन्हा दाखल केला आहे.

बबन पांडुरंग नांदे (वय 45 , सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, मूळ रा. निंबारा, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. त्याचा मेहुणा गजानन परशुराम लठाड (वय 40 , सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, मूळ रा. मांडोली, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बबन नांदे हा नानेकरवाडी येथे खोली घेवून पत्नी व मुलांसह राहत होता. त्याची पत्नी कल्पना ही तिचा पंधरा वर्षांचा मुलगा अजयसबोत गावी गेली आहे. त्यामुळे बबन हा नाणेकरवाडी येथे एकटाच राहत होता. तो येथील तळेगाव चौकात कामगार नाक्‍यावर मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी (दि. 27) रात्री नऊच्या सुमारास बबन हा त्याचा मेहुणा गजाननकडे जेवण्यासाठी आला होता. जेवणानंतर तो गप्पा मारून घरी जातो, असे सांगून निघून गेला. काही वेळाने तो परत गजानन यांच्या घरी येवून दरवाजा वाजवू लागला. त्यावेळी गजानन यांनी दार उघडून पाहिले असता दारात रक्ताने माखलेला बबन नांदे दिसला. त्यावेळी त्याच्या गळ्यावर मोठ्या जखमा होवून तो पूर्ण रक्तबंबाळ झाल्याचे दिसत होते. हे काय झाले हे त्याला विचारले असता त्याने सांगितले की कोणीतरी तीन अज्ञात व्यक्तींनी मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोणत्यातरी धारदार हत्याराने माझ्या गळ्यावर गंभीर वार केले. एवढे सांगत असतानाच तो तेथेच बेशुद्ध पडला. त्यानंतर एका रुग्णवाहिकेतून त्याला पुढील उपचारासाठी चाकण मधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर तातडीचे उपचार सुरु असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा प्रकार समजताच घटना स्थळी दाखल झालेल्या येथील पोलीसांनी घटना स्थळाचा तातडीने पंचनामा केला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)