‘गल्ली बॉय’ निघाले ‘बॅड बाईज’ 

विरोधकांकडून सरकारच्या चहापानांवर बहिष्कार 


2018पर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या 

मुंबई – राज्यात अभूतपूर्व असा दुष्काळ आहे. दुष्काळामुळे राज्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सावट आहे. सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून गेल्या साडेचार वर्षांत सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात अपयश आल्याचा आरोप करतानाच राज्यातील शेतकऱ्यांना 2018 पर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी विरोधकांनी केली. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवत उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात तरूण बेरोजगांरासह राज्यातील जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवून हे सरकार पुन्हा एकदा फसवणूक करणार असून “गल्ली बॉय’चा आव आणणारे शिवसेना-भाजपाचे सरकार “बॅड बॉईज’ असल्याची टीकाही विरोधकांनी केली.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांची संयुक्त बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत सरकारच्या फसव्या योजना आणि घोषणांचा जाब विचारण्याचा निर्धार करीत निष्क्रिीय सरकारच्या कारभाराविरोधात चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हेंमत टकले व जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला पुलवामा अतिरेकी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या साडेचार वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दिले. आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्यासाठी 6 हजार रूपयांच्या अनुदानाची घोषणा केली. त्यासाठी केंद्र सरकारने घातलेली 2 हेक्‍टरची मर्यादा शिथील करून राज्य सरकार खुप मोठा तीर मारल्याचा आव आणणार आहे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्जमाफी योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात 2015 मध्ये 3 हजार 265 आत्महत्या, 2016 मध्ये 3 हजार 80 आत्महत्या, 2017 मध्ये 2 हजार 917 आत्महत्या तर 2018 मध्ये 2 हजार 761 शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी दिली. कर्जमाफी योजना फसल्याबद्दल राज्य सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी आणि प्रायश्‍चित म्हणून 2018च्या खरीपापर्यंतचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे, या मागणीचा पुनरूच्चार त्यांनी केला.

राज्य सरकार केवळ नोकरभरतीच्या पोकळ घोषणा करीत असल्याबद्दलही त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. 2018च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे गेल्या वर्षी 28 मार्चला मुख्यमंत्र्यांनी मेगाभरतीची घोषणा केली. दोन टप्प्यात 72 हजार जागा भरण्याचा निर्णय त्यांनी सभागृहाच्या पटलावर जाहीर केला. पण वर्षभर त्यावर काहीही न करता आता निवडणूक आचारसंहितेचा बागुलबुवा करीत तरुणांची फसवणूक करणार असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला.

24 हजार शिक्षक भरतीसाठीही सरकारने मागील वर्षभरात अनेकदा घोषणा केल्या. पण अनेक मुहूर्त जाहीर झाल्यानंतर एकाही शिक्षकाची भरती या सरकारने केलेली नाही. शेवटी त्या विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात अन्नत्याग आंदोलन करावे लागले. 5 लाख कंत्राटी कामगारांचा, अंगणवाडी सेविका, संगणक परिचालक आदींचे देखील प्रश्न प्रलंबित असून, त्यावर आम्ही या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

आरक्षणाबाबत दिशाभूल 
मराठा, मुस्लीम आणि धनगर आरक्षणाबाबतही सरकारने केवळ दिशाभूल केली. मराठा आरक्षण अजूनही 100 टक्के वैध झालेले नाही. त्यावर न्यायालयाची टांगती तलवार कायम आहे. मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी असल्याच्या बाता करणारे हे सरकार अजूनही सक्षमपणे आपली बाजू न्यायालयात मांडू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारने दिलेले आणि न्यायालयाने वैध ठरवलेले मुस्लीम समाजाचे शैक्षणिक आरक्षणसुद्धा या सरकारने लागू केले नाही. धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याचा शब्द होता. आज साडेचार वर्षानंतर देखील धनगर समाजाला आरक्षण दिले गेले नाही आणि आता केवळ केंद्र सरकारला शिफारस करण्याची भाषा केली जाते आहे, या शब्दांत विखे-पाटील यांनी सरकारच्या निष्क्रियतेचा पंचनामा केला.

फसव्या विचारांची युती! 
भाजप-शिवसेनेच्या युतीवरही त्यांनी कडाडून टीका केली. शिवसेनेने ही युती भगव्या विचारांची असल्याचा युक्तीवाद केला आहे. त्याचा समाचार घेताना विखे-पाटील म्हणाले, ही युती भगव्या विचारांची नव्हे तर फसव्या विचारांची आहे. ज्यांना शिवसेनेने अफजल खानाची उपमा दिली, त्यांनाच उद्धव ठाकरे मिठी मारत असल्याचे फलक दादरमध्ये झळकल्याचे उदाहरणही त्यांनी दिले. ही युती हिंदुत्वासाठी आणि देशप्रेमासाठी असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. पण ही युती ना हिंदुत्वासाठी आहे, ना देशप्रेमासाठी आहे; तर ही युती फक्त ईडी’च्या कारवाईपासून वाचण्यासाठी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)