गर्भाशयाच्या बळकटीसाठी योगा

हे बैठक स्थितीतील आसन आहे. हे आसन दोन स्थितींमध्ये केले जाते. पहिल्यांदा जमिनीवर दोन्ही पाय पसरून बसावे. लांब मांडी घालावी, दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून घ्यावे आणि हातांच्या तळव्यांनी पाऊले पकडावी. कमरेत ताठ बसावे व आसन करताना भरपूर श्‍वास घ्यावा आणि आसन पूर्ण होताच कुंभक करावे. लक्ष स्वादिष्ठान चक्रावर केंद्रीत करावे. गुद्‌द्‌वार आणि लिंग (पुरुषांमध्ये) आणि स्त्रियांमध्ये योनीपाशी दोन्ही पायांची पावले जुळवून चिकटवावी. जांघा जमिनीला टेकलेला पाहिजे. दृष्टी स्थिर करावी. स्त्रियांनी हे आसन करताना एक काळजी घ्यावी ती अशी की, आपल्या जननेंद्रीयावर कोणत्याही प्रकारचा भार पडू देऊ नये. तसेच पुरुषांचा अंडकोश दबला जाऊ नये. आसनस्थिती दहा मिनिटे टिकवता येते. गोरक्षासनाच्या दुसऱ्या स्थितीत पोटऱ्या या जांघेखाली टेकवाव्यात. दोन्ही पाय गुडघ्या लागत ठेवून ध्यान मुद्रेत बसावे. श्‍वास घ्यावे. गुडघे शक्‍यतो जमिनीला टेकलेले हवेत. आसन स्थिती पूर्ण होताच श्‍वास रोखावा. आपले लक्ष हे स्वादिष्ठान चक्रावरच सोडून शरीर सैल करावे. पाय सरळ समोर घ्यावेत, हात मागे टेकून रिलॅक्‍समध्ये बसावे.
गोरक्षासनाचे अनेक फायदे आहेत. शुक्रग्रंथीमधील दोष दूर होऊन त्यांना व्यायाम होतो. वीर्य रक्षण होते. स्त्रियांचे प्रमेह आदी रोग दूर होतात. स्वप्नदोषाचा विकार पूर्णपणे बरा होतो. तसेच स्त्रियांचे गर्भाशय बळकट होते. सेक्‍सुअल प्रॉब्लेम्स दूर होतात. गुडघा आणि जांघेतील शीरा आणि पेशींचे कार्य सुधारते. त्या बळकट होतात. मासिक पाळीमध्ये जर अनियमितता असेल तर ती दूर होण्यास गोरक्षासन मदत करते म्हणून स्त्रियांनी रोज हे आसन करावे. जे टिकवायला सोपे आहे. आसन करताना कंबरेत वाकू नये, ताठ बसावे. दृष्टी समोर ठेवून चेहराही सरळ ठेवावा. मूत्रविकार दूर करणारे गोरक्षासन हातापायातील शुद्ध रक्ताचा पुरवठा नियमित तर करेतच पण हात-पायही मजबूत करते. ल्युकोरिया तसेच कंबरदुखी असे रोग गोरक्षासनाच्या नियमित अभ्यासाने दूर होतात. तेव्हा गर्भाशयाच्या बळकटीसाठी तसेच शुक्रासनाच्या पुष्टतेसाठी गोरक्षासन स्त्री आणि पुरुष दोघांनी करावे.
गोरक्षासन पुरुषांना ब्रह्मचर्य व्रत पालनात मदत करते. तसेच आत्मबळ, आत्मचेतना तर वाढवतेच पण एकंदर शरीरातील शक्तीही वाढते.

एकाग्रतेसाठी ध्यानात्मक आसन- स्वस्तिकासन
स्वस्तिक हे कल्याणकारी चिन्ह असते. बैठक स्थितीत शरीराची कल्याणकारी स्थिती घेणे म्हणजेच स्वस्तिकासन करणे होय. योगसारामध्ये त्याचे वर्णन आहे ते म्हणजे-
“समकाय: सुखासिन: स्वस्तिकं तत्‌ प्रचक्षते ।’ हे एक बैठकस्थितीतील आसन आहे. प्रथम पाय पसरून बसावे, नंतर उचव्या पायाची टाच डाव्या जांघेत बसवावी आणि डाव्या पायाची टाच वरून उचव्या जांघेत बसवावी. मग ताठ बसावे. हाताची ज्ञानमुद्रा ठेवून समोर पहावे. या आसनात कितीही वेळ स्थिर राहता येते. बैठक स्थिती सोडून प्रथम डाव्या पायाची टाच उजव्या जांघेत बसवावी आणि डाव्या पायावरून उजव्या पायाची टाच डाव्या जांघेत बसवावी. हात ध्यानमुद्रेत ठेवावे. चित्त एकाग्र होण्यासाठी हे आसन चांगले आहे. खूप श्रमाने पाय दुखत असतील तर या आसनात बसावे. त्यामुळे पायातील रूधिराभिसरण चांगले होते. सुरुवातीला पंधरा सेकंद बसावे. नंतर कालावधी तीन मिनिटांपर्यंत वाढवावा. तीन महिने सतत जर स्वस्तिकासनात बसलात म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूंनी केले तर तुम्हाला कित्येक तास एका ठिकाणी बसण्याची सवय लागेल. पद्मासनापेक्षा बसण्यास सोपे हे आसन आहे.
स्वस्तिकासनात छाती आणि दंड सरळ ठेवावेत. मन शांत आणि स्थिर राहण्यासाठी स्वस्तिकासन प्रभावी आहे. प्रभूभक्तीत रममाण होण्यासाठी, तसेच भजन, कीर्तनसमयी स्वस्तिकासन घालण्याची पद्धत आहे. लहान मुलांच्या मनाची चंचलता या आसनाने दूर होते. करायला सोपे असे हे ध्यानात्मक आसन होय. स्वस्तिकासनामुळे हाता-पायांचे स्नायू मजबूत होतात. चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता येते. कारण एकाग्रतेमुळे मनाचा समतोल राहतो आणि समतोल व्यक्तीमत्वाची माणसे नेहमी प्रसन्न असतात.
मनातील विचार, विकार, भावनांची वादळं शांत करण्यासाठी सर्वांनी स्वस्तिकासन रोज करावे. कारण ते करणे हे सर्वांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी योग्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)