गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा

नाशिक : जातपंचाच्या दबावाला बळी पडून मुलीला संपवणाऱ्या बापाला अखेर फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. नाशकात 2013 साली घडलेल्या या प्रकरणाने महाराष्ट्र सुन्न झाला होता.
ज्या पद्धतीने बापाने पोटच्या मुलीची हत्या केली, ते पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. ऑनर किलिंग प्रकरणात न्यायालयाने दिलेला हा निकाल सर्वात मोठा आणि महत्वाचा ठरला आहे.
प्रमिला कुंभारकर रुढी-परंपरांना न जुमानता तिने आंतरजातीय विवाह केला. लग्नानंतर ती नऊ महिन्यांची गर्भवती होती. 28 जून 2013& ज्या दिवशी प्रमिलाचा वाढदिवस होता, त्याच दिवशी तिच्या बापानंच तिचा जीव घेतला. कारण प्रमिला कुंभारकर लग्नानंतर प्रमिला कांबळे झाली होती आणि जातपंचांच्या जाचानं तिच्या माहेरच्यांचे जगणे मुश्‍किल केले होते
पोटात बाळ असणाऱ्या प्रमिलाला घेऊन लोकांनी दवाखाना गाठला. एकीकडे अनोळखी लोक तिच्या जीवासाठी धडपडत होते. आणि दुसरीकडे संवेदना हरवलेला तिचा बाप मात्र टपरीवर चहा आणि सिगारेट पित बसला होता. बेड्या पडल्यानंतरही गेंड्याच्या कातड्याच्या एकनाथ कुंभारकरला कणभरही फरक पडला नाही. उलट ती जिवंत असेल तर मी तिला पुन्हा मारतो, असे तो म्हणाला. दरम्यान, त्याच्या या वाक्‍याने पोलीसही चक्रावले. या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यभर जातपंचायतींच्या विरोधात लढा उभा केला. ज्याठिकाणी प्रमिलाची हत्या झाली, तिथली माती घेऊन अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले आणि जात बहिष्कृत कायद्याच्या निर्मितीला निमित्त मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)