गरिबांचा फ्रिज झाला महाग

माठाच्या दरात 15 ते 20 टक्‍के दरवाढ

लाखणगाव- सध्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही फ्रिजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाणी थंड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माठांच्या मागणीत घट झाली आहे. तरीही ग्रामीण भागातील आठवडे बाजारात अनेक विक्रेते माठांची विक्री करीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा माठाच्या दरात पंधरा ते वीस टक्‍के वाढ झाल्याचे माठ विक्रेत्यांनी सांगितले.

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सकाळी नऊ वाजल्यापासूनच ऊन लागायला सुरुवात होते. सायंकाळी चार वाजेपर्यत मोठ्या प्रमाणावर ऊन असते. त्यामुळे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सर्वत्र थंड पाणी पिण्यासाठी वापर होत आहे. येथील कुंभारवाड्यात एका माठांची किंमत 70 ते 150 रुपये आहे. कालानुरुप होत असलेल्या बदलांमुळे आणि आलेल्या आधुनिकीकरणामुळे पूर्वापार चालत आलेले थंड पाण्याचे माठ सध्या मात्र कमी प्रमाणावर विक्री होताना पहावयास मिळत आहेत. तरीही ग्रामीण भागातील अनेक लोक फ्रिज पेक्षा माठातील पाण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे माठांची मागणी काही प्रमाणात टिकून आहे.

माठातील पाणी आरोग्यास चांगले असल्याने अनेक लोक फ्रिज पेक्षा माठातील पाण्याला पसंती देत आहेत. माठांबरोबरच पूर्वी रांजणांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जायची. मोठे रांजण पाण्याने भरुन रस्त्याच्या कडेला पाणपोई उघडल्या जायच्या; परंतु रांजणाच्या पाणपोई ऐवजी आता थंड केलेल्या पाण्याच्या जारच्या माध्यमातूनच पाणपोई उघडल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडात माठ व रांजण यांच्या मागणीत घट झाल्याने निर्मितीतही घट होऊन आरोग्यदायी असणारे थंड पाणी मिळणे दुरापास्त होईल.
परप्रांतीय विक्रेत्यांची संख्या वाढली

पूर्वी प्रत्येक गावात कुंभार समाजाकडून माठांची निर्मिती केली जायची; परंतु सध्या अनेक गावांमध्ये माठांची निर्मिती बंद झाली आहे. ठराविक ठिकाणीच याची निर्मिती केली जाते. त्यातच मूळ स्थानिक मातीच्या काळ्या माठा पेक्षा राजस्थान, गुजरात या ठिकाणचे विक्रेते लाल माठाची विक्री करीत आहेत. त्यामुळे स्थानिक कारागिरांच्या माठांऐवजी परप्रांतीय कारागिरांचा माठ विक्रीचा व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)