‘गरवारे’ व्यवस्थापनाला सद्‌बुध्दी दे!

कामगारांचे गणरायाला साकडे : बैठकीत व्यवस्थापनाचा निषेध

पिंपरी – आपल्या हक्‍कासाठी गरवारे नायलॉन्स कंपनी (इन लिक्‍विडेशन) कामगारांनी कंपनी गेटसमोर आज (रविवारी) बैठक घेतली. कामगारांची थकीत देणी देण्याबाबत व्यवस्थापनाला सद्‌बुध्दी देण्याचे साकडे घालत व्यवस्थापचा निषेधही करण्यात आला.

1996 मध्ये गरवारे कंपनी बंद झाली असून, या घटनेला 21 वर्षे उलटली आहेत. कामगारांना कोणतीही सूचना न करता अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे पिंपरी, अहमदनगर व सारोळा येथील 1 हजार, 280 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. एकवीस वर्षांनंतरही अद्याप कामगारांना नुकसान भरपाई मिळाली नाही. न्यायाच्या प्रतिक्षेतील 250 कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या 19 एकर जागेबरोबरच 70 गुंठे जागेचीही कवडीमोल भावाने विक्री करण्यात आली आहे.

कामगारांच्या मागण्यांकडे सरकारचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामगारांचे हाल होत असून, त्यांच्यावर हलाखीने जगण्याची वेळ आली आहे. मालकांकडूनही कामगारांना त्यांच्या हक्‍कांपासून दूर ठेवले जात आहे. महापालिकेच्या तत्कालीन महापौरांनी गरवारे कामगारांना दिवाळी सणासाठी एक महिन्याचे मानधन स्वतः आणून देण्याचे आश्‍वासन दिले होते. अद्यापही त्याची पूर्तता केली नाही. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या थकीत देण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. 21 वर्षानंतरही कामगार न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. याचा निषेध म्हणून कामगार दरवर्षी या ठिकाणी जमून निषेध करतात. या वर्षीही कंपनी जवळ बैठक घेऊन निषेध व्यवस्थापनाचा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)