गरवारे नायलॉन्स कामगारांना सुखद धक्‍का

पिंपरी  – पिंपरीतील गरवारे नायलॉन कंपनी बंद होवून येत्या 27 ऑगस्ट रोजी 22 वर्षे पुर्ण होत आहेत. गेली अनेक वर्षे आपली हक्काची देणी मिळावीत यासाठी लढा देणाऱ्या कामगारांना मालकाकडील भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) टक्के हिस्सा दिला जाणार आहे. त्यामुळे कामगारांना सुखद धक्‍का बसला आहे.

कामगारांना कोणतीही पुर्वसूचना न देता 27 ऑगस्ट 1996 रोजी काम स्थगितीच्या नावाखाली गरवारे कंपनीने पिंपरीतील प्रकल्पाला टाळे ठोकले. त्यामुळे पिंपरीसह नगर, सारोळे येथील 1 हजार 280 कामगारांना नोकरी गमवावी लागली. अचानक नोकरी गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कामगार संघटना, ट्रस्ट, कोर्ट-कचेरी करत 22 वर्ष पुर्ण होण्याची वेळ आली. मात्र, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. 2005 व 2007 च्या शासनाच्या परिपत्रकाशिवाय कामगारांची देणी भागवल्याशिवाय कंपनीची मालमत्ता विकू नये, असा नियम असतानाही कामगारांना विश्‍वासात न घेताच परस्पर कंपनी विकली गेली. यातून कामगारांना थकीत देणी म्हणून 18 टक्‍केच रक्कम अदा केली गेली. उर्वरित रक्‍कम दिली जावी तसेच “ग्रॅच्युईटी’ मिळावी, “लिक्‍विडेटर’मार्फत कंपनीची सर्व मालमत्ता जप्त करावी, “पीएफ’ची 32 महिन्यांची रक्‍कम मिळावी आदी मागण्यांसाठी कामगारांचा लढा अद्याप सुरु असताना कामगारांना सुखद धक्का मिळाला आहे.

गरवारे कामगार संघटनेच्या वतीने “पीएफ’च्या रक्‍कमेसाठी पुणे भविष्य निर्वाह निधी आयुक्तांमार्फत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने कंपनी मालकाच्या बाजुची शेअर्सची रक्कम कामगारांच्या वेतनाच्या 12 टक्‍के याप्रमाणे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, “लिक्‍विडेटर’ यांनी ही रक्‍कम गरवारे नायलॉन्स कामगारांच्या “पीएफ’ खात्यावर जमा केली आहे. ही रक्‍कम कामगारांना मिळावी यासाठी कामगार संघटनेमार्फत “पीएफ’ अर्ज भरुन घेण्याची सुविधा खराळवाडी येथील टपाल कार्यालयाशेजारी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत उपलब्ध करुन दिली आहे. 26 ते 18 ऑगस्ट या कालावधीत अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. कामगारांनी तसेच मृत कामगारांच्या वारसांनी आवश्‍यक कागदपत्रांसह याठिकाणी येण्याचे आवाहन कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)