गदिमा मराठी भाषिकांच्या हृदयात व मनात

सातारा ः "गदिमा एक आठवण, एक साठवण' या विषयावर बोलताना कवी राजन लाखे, समोर उपस्थित रसिक.

कवि राजन लाखे यांचे प्रतिपादन
सातारा, दि. 19 (प्रतिनिधी) – जगाच्या पाठीवर जेथे जेथे म्हणून मराठी बोलली, वाचली, लिहिले जाते तेथील मराठी भाषिकांच्या हृदयात, मनात गदिमा म्हणजेच ग. दि. माडगूळकर आहेत. त्यांना प्रत्येकाने आपल्या मनात मानाचे स्थान दिले आहे, असे प्रतिपादन कवी राजन लाखे यांनी व्यक्त केले.
येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, शाहूपुरी शाखा आयोजित सातव्या मराठी भाषा पंधरवड्याच्या समारोपानिमित्त “गदिमा एक आठवण, एक साठवण’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत, डॉ. उमेश करंबेळकर आणि मान्यवर उपस्थित होते.
गदिमा हे अष्टपैलू नाही तर दशपैलू व्यक्तिमत्व होते. चित्रपट, कथा, पटकथा, संवाद, गाणी या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चिरस्मरणीय कामगिरी करुन रसिकांसाठी कधी न संपणारा ठेवा ठेवलेला आहे. गाणी, पदे या प्रांतातील प्रत्येक प्रकार हाताळून त्यातील सर्वोत्तम आपल्याला दिले आहे. भावगीत, भक्तीगीत, कोळीगीत, बालगीते, समर गीते, लावणी, कविता इत्यादी प्रकारातील उच्च कोटीतील साहित्य त्यांनी मराठी रसिकांना भरभरुन दिले. यावेळी राजन लाखे यांनी त्यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन अतिशय समर्पक शब्दात सांगितले.
यावेळी गदिमांच्या कविता सादर करुन प्रत्येक कवितेतून त्यांना काय म्हणायचे होते हे उपस्थितांना सांगितले. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रचना म्हणजे गीतरामायण. बाबुजींच्या संगीत साथीत गीत रामायण 56 गाण्यांतून घराघरात पोहचवले. अद्वितीय प्रतिभा संपन्नता तसेच शब्दप्रभुत्वता या दोन्ही गोष्टींच्या सहाय्याने त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
यावेळी लाखे यांनी त्यांच्या आजही प्रसिध्द असलेल्या कविता, गाणी यांची उदाहरणे दिली. प्रत्येकाच्या जीवनाला काही ना काही देणारे गदिमा होते. शब्दसौंदर्य, शब्दसामर्थ्यांचे ते प्रतिक होते, असे मतही लाखे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. कार्यक्रमास साताऱ्यातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी मसाप, शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी, गुजराथी अर्बनचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)