गतीमान प्रशासनासाठी पालिकेची “वॉर रूम’

प्रमुख प्रकल्पांचा प्रत्येक आठवडयास घेतला जातो आढावा
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – महापालिकेच्या वेगवेगळया विभागांच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या मोठया प्रकल्पांच्या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा ( विशेष) प्रेरणा देशभ्रातर आणि अतिरिक्त आयुक्त (जनरल) शितल तेली- उगले यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक आठवडयात दर बुधवारी या वॉर रूम मध्ये दोन्ही अतिरिक्त आयुक्‍तांच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला जातो. यात तब्बल पालिकेच्या सुरू असलेल्या वेगवेगळया 25 हून अधिक प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त उगले यांनी दिली.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात वेगवेगळया विभागाच्या माध्यमातून प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रत्येक प्रकल्पाचा आढावा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना घेणे शक्‍य नसल्याने दोन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांच्याकडे असलेल्या विभागांनुसार, प्रकल्पांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरात सध्या महापालिकेच्या माध्यमातून भामा-आसखेड प्रकल्प, बीआरटी मार्ग उभारणी, स्मार्ट रस्ते उभारणी, पंतप्रधान आवास योजना,संपूर्ण शहरात एलईडी फिटीगंज बसविणे, महापालिकेच्या मिळकतींचे जीपीएस मॅपिंग, महापालिकेची तक्रार निवारण प्रणाली, वेगवेगळया विभागांसाठी संगणक यंत्रणा तयार करणे, डीबीटी योजना अशा वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.मात्र, प्रत्येक योजनेचे काम कुठ पर्यंत आले. त्यात काही अडचणी आहेत का याचा आढावा घेणाऱ्या बैठका पालिका आयुक्तांना शक्‍य होत नसल्याने वॉर रूममध्ये या प्रकल्पांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे काम कालब्ध्द करणे शक्‍य होत असून अनेक प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असल्याचे चित्र आहे.
———————–
विकासकामांना येतेय गती
या पूर्वी एखादी योजना सुरू झाल्यानंतर महापालिकेत योजने बाबत एखादी समस्या निर्माण झाली अथवा त्यावरून काही गोंधळ निर्माण झाला तरच आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून आढावा बैठका घेतल्या जात होत्या. तर जास्तच गरज भासली तर महापालिका आयुक्त स्वत: बैठका घेत. त्यामुळे योजनांच्या कामांना फारसी गती नसल्याने अनेक योजनांचे काम वर्षानुवर्षे रेंगाळत असल्याचे चित्र होते.मात्र, गेल्या महिन्याभरापासून हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रशासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचे काम या वॉर रूम मुळे युध्द पातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यातच त्याचा अंतिम आराखडा तयार पूर्ण करून तो शासनास पाठविला जाणार आहे.

——————-

महापालिका प्रशासनाकडून जुलै पासून ही वॉर रूम सुरू केलेली आहे. अत्ता पर्यंत या वॉर रूमच्या माध्यमातून पाच ते सहा बैठका झाल्या असून प्रकल्पांमधील अडचणी, कामाची गती, प्रत्येक आठवडयास होणारी कामाची प्रगती यावर यात चर्चा केली जाते. या बैठकांना संबधित विभाग प्रमुखांसह इतर विभागांचे प्रमुखही उपस्थित असल्याने प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून प्रकल्पांचे कालबध्द नियोजन करणे शक्‍य होत आहे. – शितल तेली- उगले ( अतिरिक्त आयुक्त)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)