गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला भारतीय कुमारांचा धक्‍का

जोहोर बाहरू: अत्यंत रोमांचकारी लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सनसनाटी मात करताना भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या सुलतान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. भारताच्या ज्युनियर संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान 5-4 असे मोडून काढताना गटांत अग्रस्थानावर झेप घेत उपान्त्य फेरीतील स्थानही निश्‍चित केले.

 

गुरसाहिबजित सिंगने पाचव्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करून भारताचे खाते उघडले. यातून ऑस्ट्रेलियन संघ सावरण्याच्या आतच हसप्रीत सिंगने 11व्या मिनिटाला, मनदीप मोरने 14व्या मिनिटाला, तसेच विष्णुकांत सिंगने 15व्या मिनिटाला लक्ष्यवेध करताना भारताचे वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्याच सत्राअखेर 0-4 असे पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला खऱ्या अर्थाने पुनरागमन करता आले नाही. दुसऱ्या सत्रात डेमन स्टीफन्सने दोन गोल करीत ऑस्ट्रेलियाची पिछाडी 2-4 अशी कमी केली. शिलानंद लाकराने 43व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल केला.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दडपणाखाली भारताने 59व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक गमावला व स्टीफन्सने सहज गोल करीत ऑस्ट्रेलियाची पिछाडी 4-5 अशी कमी केली. त्यानंतर मात्र भारतीय संघाने अखेरपर्यंत कडवी झुंज देत विजयाची पूर्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)