गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच

खासदार उदयनराजे:”सनबर्न’ला परवानगी,मग डॉल्बीला का नाही
सातारा- काहीही झाले तरी गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदारपणे ठणकावले. “सनबर्न’ला परवानगी देता मग डॉल्बीला का नाही? असा सवाल खा. उदयनराजे भोसले यांनी करत जर कायदा सुव्यवस्येचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जिल्हा प्रशासन जवाबदार राहिल असा इशारा दिला आज सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना उदयनराजे यांनी रोखठोक भूमिका मांडली.

गेले काही दिवस गणेश विसर्जनाच्या प्रश्नावरुन साताऱ्यात कायदेशीर खल सुरू आहे. पोलीस, प्रशासन तसेच न्यायालय यांच्या निवाड्यावरुन गणेश विसर्जनासंदर्भात दरराजे नवनव्या अफवांची मालिका सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. साताऱ्यातील मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास खा. उदयनराजे भोसले यांनी परवानगी दिली असली तरी त्या अनुषंगाने दररोज प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोर्टाच्या अवमानाची भीती दाखवली जात आहे. या साऱ्या प्रश्नांना आज उदयनराजे स्टाईल सडेतोड उत्तरे मिळाली त्यामुळे ही बैठक खऱ्या अर्थाने वादळी ठरली.

बैठकीत बोलताना खा. उदयनराजे यांनी पोलीस व प्रशासनाच्या धोरणावर सडकून टीका केली. काही क्रियानिष्ठ लोकांमुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश विसर्जना दिवशी जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास पोलीस व प्रशासनच जबाबदार असेल. मंगळवार तळे आमच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्याबाबत काय निर्णय घ्यायचा तो अधिकार आम्हालाच आहे. तळ्यात विसर्जन करण्यास आम्ही यापूर्वीच परवानगी दिली आहे.

तळे आमच्या मालकीचे असल्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याचा प्रश्नच येत नाही. कारवाई व्हायची असेल तर ती आमच्यावर होईल. कार्यकर्त्यांवर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी निश्‍चिंत रहावे, असे उदयनराजे म्हणाले. उद्या तुम्ही म्हणाल, उदयनराजे यांनी जलमंदिरात जावू नये. तुमचा काय संबंध? आमच्या घरात आम्ही काय करायचे तो आमचा प्रश्न आहे. या लोकांना कायदा कळतो की नाही, हा प्रश्नच आहे. खरेतर यांनी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडून अभिप्राय मागवायला हवा होता, अशा शब्दांत त्यांनी पोलीस यंत्रणेला फटकारले. प्रत्येक उत्सवावेळी कोलदांडा घालण्याची पोलीस व प्रशासनाची भूमिका योग्य नाही. लोकांच्या मनात भय निर्माण करणे बरोबर नाही, असे सांगून उदयनराजे यांनी आपण सदैव कार्यकर्त्यांच्या पाठिशी आहोत, याचा पुनरुच्चार केला.

यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, प्रतोद ऍड. दत्ता बनकर, प्रकाश गवळी, भाजपचे विजय काटवटे, नगरसेविका सिद्धी पवार, यांनी सुध्दा आपले विचार मांडले. गणेश विसर्जनाच्या सोयीसाठी मंगळवार तळ्याचा आग्रह धरला. नगराध्यक्षा स्मिता घोडके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, मंडळांचे पदाधिकाऱ्यांसह सातारा शहरातील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांशी येत्या सोमवारी चर्चा करणार
याप्रसंगी डॉल्बीचा विषयही उपस्थित झाला. पुण्यात “सनबर्न’ ला परवानगी देता, तर मग डॉल्बीला का नाही? असा खणखणीत सवाल त्यांनी याप्रसंगी केला. यासंबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी येत्या सोमवारी चर्चा करणार आहोत. डेसिबलची मर्यादा घालून डॉल्बीला परवानगी द्यायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला. डॉल्बीचा रोजगार करणाऱ्यांनी पोटे कशी भरायची ? असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील साखर कारखाने तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात वायू व जल प्रदुषण होत आहे. त्याबाबत प्रशासन काय करत आहे?

काही लोकांना प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची सवय लागली आहे. शहराचा विकास व्हायचा असेल तर अशा प्रवृत्तींना आवर घालणे गरजेचे आहे. कारण नसताना जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या प्रश्नात गोंधळ घातला आहे. गणेश विसर्जन मार्ग ठरविण्याचा यांना काय अधिकार? नगरपालिकेच्या हद्दीबाहेर गणपती का न्यायचा, असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे हा सारी व्यवस्थाच मोडित काढण्याचाच प्रकार आहे. कार्यकर्त्यांवर जर गणेशोत्सवात गुन्हे दाखल झाले तर त्यांच्या पाठिशी आपण स्वत: उभे राहणार आहोत, असा शब्द खा. उदयनराजे यांनी शेवटी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)