गणेश विसर्जनाच्या तोंडावर खड्ड्यांचे विघ्न

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे, ड्रेनेजचे खचलेले चेंबर, मेट्रोच्या कामाचे बॅरीकेटस या सगळ्यांचा अडथळा पार करत बाप्पांना विसर्जनादिवशी जावे लागणार आहे.

शहर स्मार्ट करण्याच्या नादात महापालिकेने अनेक ठिकाणी रस्ते लहान केले आहेत तर काही ठिकाणी निम्मा रस्ता व्यापतील असे फुटपाथ बांधून ठेवले आहेत. नुकतेच आयुक्तांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली असता डेक्कन येथे प्रयाग हॉस्पिटल चौकात केलेल्या फुटपाथचा विसर्जनाला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. हा फुटपाथ फोडण्याची वेळ महापालिकेवर आली.

-Ads-

शहरातील मानाचे गणपती जाण्याचा मार्ग म्हणजे लक्ष्मी रस्ता. “अर्बन स्ट्रीट डिझाइन गाईडलाइन्स’नुसार या रस्त्याची पुनर्रचना या वर्षांत करण्यात आली आहे. त्या रचनेत या रस्त्यावरील फुटपाथची रुंदी वाढवल्याने लहान झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत त्याचा अडथळा मंडळांना होणार आहेच; परंतु त्याचबरोबर छोट्या रस्त्याने मंडळांना मोठेमोठे रथ नेणे अवघड होणार आहे.

याशिवाय विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी फुटपाथवरची गर्दी ही ओसंडून वाहात असते. फुटपाथची रुंदी वाढवल्याने येथील गर्दीला कंट्रोल करणे पोलीसांना अतिशय जड जाणार आहे. यामुळे चेंगराचेंगरीचे प्रकारही जास्त होत असून, हा बदल पोलीसांनाही यंदा नाकात दम आणणारा ठरणार आहे.

विसर्जन मिरवणुकीत मानाचे गणपतींच्या मंडळांमध्ये दीडशे ते दोनशे सदस्य असलेले ढोलपथक आणि अन्य पथके असतात. त्यांना आधीच हा रस्ता पुरत नाही. त्यातून रस्त्याची रुंदी आणखी लहान झाल्याने या पथकांचा विस्तार लांबीला मोठा होण्याची शक्‍यता आहे. अशावेळी मिरवणूक पुढे सरकण्यालाही मर्यादा येणार असून, दरवर्षी मिरवणुकीसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा पोलीसांचा असलेला प्रयत्नही यावेळी फसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून मिरवणूक नेण्याचा शिरस्ता अनेक मंडळांचा आहे. मात्र रस्त्यातील अडथळ्यांचा अभ्यास यंदाच्यावर्षी मंडळांना करावाच लागणार असून, त्यानुसारच रथांची रचना आणि त्यानुसारच मार्गक्रमण करावे लागणार हे निश्‍चित आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)