गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

  • डीजे, डॉल्बीला बंदी

लोणावळा, (वार्ताहर) – विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आग्रही सूचना गणेश मंडळांना लोणावळा शहर पोलिसांनी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे, नायब तहसिलदार आर. एल. कांबळे, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता मुकुंद तेलके व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव म्हणाले, धर्मादाय आयुक्‍तांकडे मंडळांची नोंदणी करावी. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारणे, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेवून स्पीकरचा आवाज ठेवावा. डीजे व डॉल्बीला बंदी असल्याने कोणी डीजे व डॉल्बीचा वापर करू नये. गणेश मूर्तींच्या उंचीची स्पर्धा न करता लहान मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. विसर्जन मिरवणुकीत सुस्थितीतील वाहने वापरावीत, मानाच्या गणेश मंडळांनी रांगेतील इतर मंडळांचे बाप्पा देखील रात्री बारापूर्वी विसर्जित होतील, याची खबरदारी घ्यावी.

लोणावळ्यातील गणेश विसर्जन मार्गावरील लोंबलेल्या विजेच्या तारा वीज वितरणने अनंत चतुर्थी पूर्वी काढून घ्याव्यात, अशी मागणी यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली. उप विभागीय पोलीस अधिकारी शिवथरे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांना जमा झालेल्या निधीचा विनियोग समाज कार्यासाठी करावा, असा सल्ला दिला. वीज वितरणचे अधिकारी तेलके यांनी गणेश उत्सवात दहा दिवस शहरात कोठेही वीज बंदचे विघ्न येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेऊ, असे आश्‍वासन दिले. मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढणे, नदीपात्रावर व मार्गावर पुरेशी वीज व्यवस्था, आपत्‌कालीन पथक, रस्ते दुरुस्ती ही सर्व कामे पूर्ण केली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)