गणेशोत्सव मंडळाना सवलतीत वीजपुरवठा

महावितरणचे कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश; वीजदराचा एकच स्लॅब
नगर – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सवलतीच्या वीजदरासह एकच स्लॅब ठेवला आहे. या मंडळांनी वापरलेल्या शेवटच्या युनिटलाही वहन आकारासह केवळ 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यात गुरुवार (दि. 13) पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध असलेले हे मीटर प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अस्थिर आकार आणि 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार असा एकूण 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट सध्याचा दर आहे. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्‍चित करण्यात आले आहेत; मात्र सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 4 रुपये 38 पैसे दर आकारण्यात येणार आहे. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचे वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहेत.
महावितरणने आपल्या अधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या काळात अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. वेगवान हवा किंवा पावसाच्या पाण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या विजेच्या तारा खाली झुकलेल्या नाहीत किंवा विस्कळीत झालेल्या नाहीत ना, याची दैनंदिन तपासणी करावी, सुरक्षित अंतरापेक्षा अधिक उंचीवर करण्यात आलेल्या वीजपुरवठयाची तपासणी करीत राहावी, गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविक मंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात, अशा गर्दीच्या ठिकाणी पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश मंडपातील वीजयंत्रणेची वीजतंत्री कामगारांकडून दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास 24 तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)