गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी प्रयत्न करा

उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना

प्रभात वृत्तसेवा

पुणे – गणेशोत्सव गुलाल मुक्त, डॉल्बी मुक्त आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. गणपती विसर्जनाच्या वेळी नदीकाठी पुरेसा उजेड, नदीकाठी स्विमर्स तसेच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हॉस्पीटलमध्ये 10 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिल्या आहेत.

गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक झाली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र रसाळ, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी विनोद चव्हाण आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेश मंडळांना मंडपासाठी देण्यात आलेली परवानगी दर्शनी भागात लावणे आवश्‍यक आहे. सदर परवानगी दर्शनी भागात लावण्यात आली आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी पुणे शहर व हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक स्थापन करण्यात आले असल्याचे मुठे यांनी सांगितले.
गणपती विसर्जनाच्या दिवशी नदीकाठी स्विमर्स नेमण्यात यावे, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी, त्याचबरोबर तातडीच्या वेळी ऍम्ब्युलन्सची सुविधा ठेवणे, नामांकित हॉस्पीटलमध्ये 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीवेळी घाटाच्या ठिकाणाबाबत नियोजन करावे, घाटावर विद्युत व्यवस्था, घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत व्यवस्था आणि खड्डे दुरुस्त करण्यात यावे, गर्दीबाबत योग्य नियोजन करणे तसेच आवश्‍यक असलेल्या घाटांवर एनडीआरएफचे पथक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, जनावरांच्या वाहतुकीसाठी सक्षम अधिकाऱ्यांकडील प्रमाणपत्रे असणे बंधनकारक आहे. जनावरांची अवैध वाहतुक होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील 11 टोल नाक्‍यांवर पोलिस प्रशासन आणि पशुसंवर्धन अधिकारी यांचे तपासणी पथक नेमण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मुठे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)