‘गणेशोत्सव जनकत्व’ वाद धुमसतोय!

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाने सन्मान स्वीकारला

स्वीकारलेले मानचिन्ह ठेवले महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर

पुणे – पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त सर्व मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनीही मानचिन्ह स्वीकारले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या जनकत्वावरून निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, कार्यक्रमानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मानचिन्ह आणि सत्कार महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून दिला. त्यामुळे हा वाद अजून धुमसतच असल्याचे स्पष्ट होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक हे भाऊसाहेब रंगारीच आहेत. तर यंदाचे गणेशोत्सवाचे वर्ष 125 वे नसून 126 वे आहे, असा दावा भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी मंडळाने महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीसही बजावली आहे. यानिमित्त महापालिकेतर्फे नियोजित करण्यात आलेल्या उपक्रमांच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमांच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शनिवारी पुण्यात आले होते. त्यावेळी भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडईत निषेध आंदोलनही केले. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आणि मानचिन्ह स्वीकारले. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याची चिन्हे दिसत होती. मात्र, कार्यक्रमानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मानचिन्ह आणि सत्कार महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून दिला. त्यामुळे हा वाद आणखी धुमसत असल्याचे बोलले जात आहे.

पदाचा मान ठेवून स्वीकारला सत्कार

महापालिकेतर्फे आयोजित शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात आम्ही सत्कार स्वीकारायला गेलो नव्हतो. आमच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखलही घेतलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कोणी सुरू केला, याबाबत स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोशामध्ये असलेल्या संदर्भाचा शासकीय पुरावा फ्रेम करून मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आम्ही तेथे गेलो होते. यावेळी पदाचा मान ठेवून मंडळाच्या अध्यक्षांनी हा सत्कार स्वीकारला. मात्र, त्यानंतर आम्ही हा सत्कार महापालिकेला परत केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वादासंदर्भात महापालिका पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत निर्णय घ्यावा, असे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सूरज रेणुसे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)