गणेशोत्सवासाठी पालिकेचे स्वतंत्र संकेतस्थळ

देश-विदेशात अनुभवता येणार पुण्यतील गणेशोत्सव
प्रभात वृत्तसेवा

पुणे – सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेने पुण्यातील गणेशोत्सवाबाबतची अद्ययावत माहिती देण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ आणि ऍपची तसेच स्वतंत्र सोशल मिडिया पेजेसचीही निर्मिती केली आहे. या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महापालिकेकडून शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने आयोजित केलेले कार्यक्रम तसेच शहरातील गणेशोत्सव देश-विदेशातील नागरिकांना हा सोहळा घरबसल्या अनुभवता यावा यासाठी morya125.in या संकेतस्थळाची, Morya125 या ऍड्रॉईड ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मिडियावर स्वतंत्र पेजेसही तयार करण्यात आले आहे. या सर्व डिजीटल माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव जगभरात पोहोचविण्यात येत आहे. मनपाच्या गणेशोत्सवादरम्याच्या सर्व उपक्रमांची माहिती, वाहतूक व्यवस्थेतील बदल, मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांची माहिती आणि लाईव्ह आरती, ढोल पथकांची माहिती, नकाशातील स्थानासह सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणांची तसेच विसर्जन हौदांची माहिती ऍप आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय छायाचित्रे, व्हिडिओ, गणपतीची मराठी आणि अर्थासह इंग्रजी भाषेतील आरती आदी माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. तसेच या संकेतस्थळासाठी पुण्यातील गणेश मंडळांनी त्यांच्या गणेश मंडळाचा यावर्षीचा देखावा, आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्य आदी बाबतची माहिती द्यावी असे आवाहनही महापौरांनी शहरतील गणेश मंडळाना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)