पुणे – गौरी-गणपती सणासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन (एसटी)तर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन या बस स्थानकांवरून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गौरी-गणपती सणानिमित्त दि. 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान या जादा बसेस सुटणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोकणवासीय नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. याचा विचार करून एसटीच्या पुणे विभागाने चिपळूण, मालवण, गुहागर, दापोली, देवरुख, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, महाड यामार्गावर या जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच, आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध केली आहे. एसटीच्या मान्यताप्राप्त खासगी एजंटमार्फत ऑनलाईन आरक्षणाव्दारेही सेवा उपलब्ध आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

जादा प्रवासी असल्यास खास सोय
गौरी-गणपतीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता जादा बसेस सोडण्यात येतील. तसेच, प्रवाशांना आणखीन चांगली सुविधा मिळावी यासाठी एकाच ठिकाणाहून कोकणात जाणाऱ्या 40 नागरिकांनी ग्रुप करून मागणी केल्यास त्यांना संबंधित ठिकाणाहून जादा बस सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)