गणेशोत्सवावर “चायना मेड’चा दबदबा

पिंपरी – अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गौरी-गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी सजावट साहित्याने दुकाने सजली असून त्यावरही “चायना मेड’ वस्तूंचा दबदबा आहे. मंदिरापासून ते मोत्याच्या माळा, इलेक्‍ट्रीक वस्तूंपर्यंत सारे काही “चायना मेड’ असल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी गौरी-गणपती आणि गौरी उत्सवादरम्यान भारत व चीन दरम्यान डोकलाम येथील सीमावादावरुन दोन्ही देशाचे सैनिक समोरासमोर आले होते. त्याचा परिणाम देशात आणि राज्यात चिनी वस्तूंवर पडला होता. गतवर्षी देशातील नागरिक चिनी वस्तूंवर खुलेआम बहिष्कार टाकत होते. तर महाराष्ट्रात चिनी वस्तुंची होळी करण्यात आली होती. नागरिक चिनी वस्तूंना टाळत स्वदेशी सजावट साहित्य विकत घेत होते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कसलाही परिणाम दिसत नसून नागरिक सर्रास चिनी वस्तू खरेदी करत आहेत.

आकर्षक दिसणाऱ्या आणि स्वस्त असल्याने ग्राहक चिनी वस्तुंकडे आकर्षित होत आहेत. सजावट साहित्यामध्ये एलईडी दिव्यांच्या माळा, झुंबर, रंगीबेरंगी पताका व अन्य इलेक्‍ट्रिक आकर्षक साहित्य बाजारात झळकत आहेत. चायना मालाच्या तुलनेत स्वदेशी माल टिकाऊ आणि चांगला आहे. मात्र चायना मालाच्या तुलनेत स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचा दर जास्त असल्याने ग्राहक चायना मालच जास्त खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

प्लॅस्टिक बंदीमुळे साहित्य महागले
महाराष्ट्र सरकारने पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी प्लॅस्टिक व थर्माकॉल बंदीचा निर्णय यावर्षी घेतल्याने प्लास्टिक, थर्माकॉल वापरावर मर्यादा आल्या आहेत. गौरी व गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सजावट साहित्यात थर्माकॉलचा वापर थांबल्यामुळे बाजारात लाकडी सजावट साहित्य आले आहे. लाकडी साहित्य महाग असल्याने गौरी, गणेश भक्तांना यावर्षी जादा पैसे मोजावे लागत आहेत. प्लॅस्टीक आणि थर्माकॉल बंदी असली तरी काही साहित्य थोड्याफार प्रमाणात आजही दिसत आहे.

प्लॅस्टिक बंदीमुळे यावर्षी विक्रीसाठी लाकडी मखर आणि इतर साहित्य आले आहे. लाकडी साहित्य महाग असल्याने ग्राहकांचा म्हणावा तसा यावर्षी प्रतिसाद मिळत नाही. या सणादरम्यान प्लॅस्टिक बंदी शिथिल करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
– जय बनवारी, सजावट साहित्य विक्रेता, पिंपरी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)