महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन : तात्पुरती अधिकृत वीजजोड घ्या

पुणे – सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीच्या आकारासह 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी, तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे; तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्‍यता असते.

वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड नको !
संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्‍यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तातडीच्या मदतीसाठी 24 तास टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)