गणेशोत्सवात पोलिसांनी उपसले प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार

वाकी  -तमाम गणेश भक्तांकडून साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले विविध उपक्रम उत्साहात होण्याकरिता पुणे ग्रामीण पोलीस विभाग सज्ज झाला असून, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था चांगली राहण्याकरिता उद्योग पंढरीतील नाणेकरवाडीसह खराबवाडी व मेदनकरवाडी (ता. खेड) परिसरात ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे. त्यात जिल्ह्याच्या हद्दीतील हजारो जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. यासाठी उद्योग पंढरीतील अनेक ठिकाणी पोलिसांकडून संचलन करण्यात येत असून, उत्सव कालावधीत परिसरात पोलिसांनी चोख व कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
उद्योग पंढरीतील नाणेकरवाडीसह खराबवाडी व मेदनकरवाडी (ता. खेड) या गावात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा करण्यात येतो. त्यामुळे विस्तारत्या वरील वाड्या-वस्त्यांमध्ये गणेश उत्सव आणि आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट व चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे होत असल्याने या परिसरात उत्सव कालावधीत यात्रेचे स्वरूप आले आहे. उत्सव शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलीस दलाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. विस्तारत्या औद्योगिक भागात कामगार वर्ग मोठा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता सलग दहा ते बारा दिवस उत्सव कालावधीमध्ये परिसरात कडक पहारा ठेवला जाणार असल्याचे खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे, चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, उपनिरीक्षक प्रदीप पवार, प्रशांत पवार, उपनिरीक्षक श्रीधर जगताप, अर्चना दयाळ आदींनी आवर्जून सांगितले.
गणेशोत्सव कालावधीत गणेशभक्तांना मनमुरादपणे या उत्सवाचा भरपूर आनंद घेता यावा, यासाठी दंगल नियंत्रण पथक व राखीव पोलीस दल सज्ज झाला आहे. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या या परिसरातील शेकडो जणांवर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी सीआरपीसी 107 अंतर्गत हजारो जणांवर प्रस्तावित कारवाई केली आहे. त्यापैकी मोजक्‍या लोकांवर कारवाईचे हत्यार उपसण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)