गणेशोत्सवात देहूत अंधाराचे साम्राज्य

देहुरोड, (प्रतिनिधी) – गणेशोत्सवात देहुतील विद्युत पुरवठ्यावर संक्रात आल्याने विविध भागांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

उत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळ व घरा-घरांत गणरायाचे आगमन झाले. विद्युत रोषणाई, विविध सामाजिक, सांस्कृतिक देखावे आणि समाज प्रबोधन, मनोरंजनपर जिवंत देखाव्यांची मंडळांनी बाल कलाकारांकडून तयारी करून घेतली. देहू महा-वितरणाच्या अंतर्गत असणारे तळवडे, विठ्ठलवाड़ी देहू, माळवाडी, बोडकेवाडी, येलवाडी, झेंडेमळा, काळोखे मळा, हगवणेमळा, नायडूनगर, लक्ष्मीनगर, चिंचोली, किन्हई आदी गावांत प्रतीदिन आठ ते बारा तास विद्युत पुरवठा खंडित होतो. वेगवेगळ्या ठिकाणी तुटणारे केबल, विद्युत तारा, नादुरस्त होणारे फिडर, डीपी दुरूस्त करून खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास महा-वितरण कर्मचाऱ्यांना वेळ लागत असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले.

देहू-देहू फाटा, देहू-देहुरोड, देहू-आळंदी मार्गावर बंद असलेले पथदिवे आणि खड्डेमय बनलेल्या मार्गामुळे पादचारी नागरिकांसह वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. सलग तीन-चार दिवस सुरू असलेल्या खंडित विद्युत पुरवठ्याने गिरण्या, यांत्रिक उपकरणे बंद झाल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायासह ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम झाला. ऐन गणेशोत्सवामध्ये सर्वत्र पसरलेल्या अंधाराच्या साम्राज्याने गणेश भक्‍तांच्या उत्साहावर विरजण पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)