गणेशोत्सवात कार्यकर्त्यांनी कायद्याचा आदर ठेवा

  • पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

तळेगाव स्टेशन – गणेशोत्सव साजरा करताना कार्यकर्त्यांनी कायद्याचा आदर ठेऊन नियम व अटींचे पालन करावे. न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेला बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळ आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील पोलीस ठाण्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील बोलत होत्या. या वेळी आमदार बाळा भेगडे, देहुरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त श्रीधर जाधव, तळेगावचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, देहुरोडचे पोलीस निरीक्षक सुरेश धस, पोलीस निरीक्षक तळेगाव एमआयडीसी राजेंद्र कुंटे, कुंदा गावडे, वैभव सोनवणे, अबुकर लांडगे, नगरसेवक किशोर भेगडे, अरुण माने, माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लहूमामा शेलार, जालिंदर गाडे, बाळासाहेब सातकर, बाळतात्या भेगडे, दक्षता समितीच्या उषा खोल्लम, मंगल मुऱ्हे, वीणा करंडे यांच्यासह विविध गावचे पोलीस पाटील व सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ गणेश मंडळ, कालिका तरुण मंडळ, तिळवण तेली समाज, राजेंद्र चौक, गणेश तरुण मंडळ या मानाच्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच मागील वर्षी गणेशोत्सव काळात चांगली कामगिरी केलेल्या 19 मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी गणेशोत्सव काळातील मंडप, वीजजोड, विविध खात्यांचा परवाना, सजावट आणि देखावे, सुरक्षा, स्वयंसेवकाची भूमिका आदींवर चर्चा करण्यात आली.

मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हे करावे…
कार्यकर्त्यांनी विचारलेल्या शंकाचे पोलीस अधिकाऱ्यांनी निरसन केले. डीजे व डॉल्बी वाद्याला पोलीस प्रशासनाकडून पूर्ण बंदी असल्याचे सांगण्यात आले. पारंपरिक वाद्याचा वावर करावा. मात्र 90 डेसीबलपेक्षा अधिक ध्वनिप्रदूषण झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. मंडळानी मंडप उभारताना एक तृतीयांश रस्त्याचा वापर करावा. मंडपाचे प्रवेशद्वार रस्त्याच्या वाहतुकीच्या दिशेने असावे. चौकात मंडप टाकताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने सभा मंडप, कमानी उभाराव्यात. मंडपाचा आकार काटकोनात नसावा. सीसीटीव्ही असावेत. गणपती उत्सव काळात अनुचित प्रकाराला आळा बसण्यासाठी रात्रंदिवस स्वयंसेवक नेमावेत. वर्गणी गोळा करताना कार्यकर्त्यांनी कोणावरही जबरदस्ती करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)