गणेशोत्सवातून समाजातील मरगळ दूर होण्यास मदत

कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकत्र येण्याचे महापौरांचे आवाहन
प्रभात वृत्तसेवा

पुणे – गणेशोत्सव मंडळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि देखाव्यांमधून सामाजिक संदेश देतात. त्याचा परिणाम समाजमनावर होतो. त्यामुळे शहराची परंपरा व सांस्कृतिक राजधानी म्हणून आलेख मोठा होत आहे. तसेच या उत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र आला तरच समाजातील मरगळ दूर होईल, असे सांगत महापौर मुक्ता टिळक यांनी कार्यकर्त्यांसह नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या महागणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शैलेश टिळक, विभागीय व्यवस्थापक, सुशील जाधव, स्पर्धेचे परीक्षक पराग ठाकूर उपस्थित होते.

वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणे हे मंडळांचे वैशिष्टये आहे. मंडळात जे पडेल ते काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते. म्हणून ते खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट गुरू असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळे केवळ उत्सवापुरतेच नाही तर ते वर्षभर कार्यरत असतात. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले जात आहे. लोकमान्य सोसायटी ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असून नफ्यातील मोठा हिस्सा समाजाला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुशील जाधव यांनी सांगितले. दरम्यान, यंदाचे सर्वोत्कृष्ट मंडळाचे पारितोषीक सहकारनगरमधील अरण्येश्‍वर मित्र मंडळाने पटकाविले आहे. गणेश पेठेतील काळभैरवनाथ तरूण मंडळाने द्वितीय तर येरवड्यातील अष्टविनायक मित्र मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच वर्षभर समाज उपयोगी उपक्रम राबविणारे धनकवडीतील आदर्श मित्र मंडळ, हिंद माता तरूण मंडळ, वीर शिवराज मंडळ, संयुक्त प्रसाद मंडळ, एस. के. एफ. चिंचवड, महाराष्ट्र तरूण मंडळ या मंडळांचा विशेष सन्मान करण्यात आला. सोसायटी विभागात समृध्दी सोसायटी आंबेगाव, आदर्शनगर गुलटेकडी, विशाल रेसिडेन्सी चाकण, विशाल पार्क चाकण आणि नवपिनाक सोसायटी औंध यांना गौरव पारितोषीक देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)