गणेशोत्सवाच्या खर्चात कपात करुन लोककलावंताला मदत

पुणे – गणेशोत्सवासाठी मंडळाची सजावट, ढोल-ताशा पथक, मिरवणूक, देखावा अशा उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चात कपात करुन लोककला जपणाऱ्या गरजू लोककलावंताला आर्थिक मदतीचा हात देण्याचा आगळावेगळा उपक्रम आकार मित्र मंडळाने राबविला आहे. गणेशोत्सवात प्रत्येक मंडळासमोरील स्पिकर्सवरुन कानावर पडणाऱ्या टिंब टिंब टिंबाली… या गाण्याचे गीतकार उत्तम कांबळे यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना मंडळाने त्यांच्याकरीता आर्थिक मदतीचा हात पुढे करीत लोककलेला जपण्याचा प्रयत्न केला आहे.
कोथरूडमधील आकार मित्र मंडळतर्फे डहाणूकर कॉलनीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अभिनंदन थोरात, अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, गायक प्रदीप कांबळे, मंडळाचे उत्सवप्रमुख सचिन फोलाने, प्रकाश बारड, शशिकांत पोहरकर, राकेश बांदिवडेकर, महेंद्र कडू, बाळकृष्ण निढाळकर, हेमंत धनवे, अजित सोमवंशी, वैभव कोठूळे, संतोष वरक, सोमनाथ घवाडे आदी उपस्थित होते. यावेळी कांबळे यांना 21 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, उत्तम कांबळे हे लोककलाकार सध्या आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असून ही मदत मुख्यमंत्री निधीतून मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
सचिन फोलाने म्हणाले, गणेशोत्सवात होणारा अवास्तव खर्च टाळून मंडळाने सामाजिक उपक्रम राबविला आहे. मंडळातर्फे गणेशोत्सवाचा खर्च कमी करून ही मदत देण्यात आली असून अशा लोककलावंतांना मदत करण्याकरीता पुण्यातील मंडळांना पुढे यायला हवे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)