गणेगाव मॅरेथॉन 2018 ला राज्यभरातून प्रतिसाद

रांजणगाव गणपती ः गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथे फ्री रनर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आणि गणेगांव हाफ मॅरॅथॉन 2018 यांच्या संयुक्त विद्यमाने महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनसाठी तालुक्‍यातील स्पर्धकांसह राज्यभरातील धावपटूंनी भाग घेतला, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील यात सहभागी झाले होते.
रविवारी (दि. 28) पहाटे पाच वाजता गणेगाव-रांजणगाव गणपती मार्गावरील मोकळ्या मैदानावरून मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे हे दुसरे वर्षे आहे.
या स्पर्धेत 5, 10 आणि 21 कि. मी. धावणे, पुरुष आणि महिला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या प्रथम तीन क्रमांकांना स्मृती चिन्ह आणि रकमेचा धनादेश, तसेच सहभागी खेळाडूंना टी-शर्ट आणि पदक देण्यात आले. महाराष्ट्र केसरी विजेता अभिजित कटके आणि महाराष्ट्र कबड्डी संघाचा कर्णधार नितीन मदने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी परदेशी पाहुण्यांसह फ्री रनर चॅरिटेबल ट्रस्टच्या संगीता ललवानी, जितेंद्र नायर, महामार्ग वाहतूक अधीक्षक अमोल तांबे, तहसीलदार अर्चना तांबे, सरपंच रमेश तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गणेगाव हाफ मॅरेथॉनमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लेझीम खेळाचे सादरीकरण केले. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कराटेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सांगली जिल्ह्याच्या हलगीच्या तालावर बक्षिसाचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठाबरोबर महिलांचा सहभाग या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले.

स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम तीन विजेते पुढीलप्रमाणे
पाच कि. मी. धावणे – (पुरुष)
अक्षय मोरे (कोल्हापूर), प्रताप जाधव (कोल्हापूर), अभिजीत मोरे (शिक्रापूर)
पाच कि. मी. धावणे – (महिला)
दीपाली ठाकरे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर), रुख्मिणी जन्मले (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर), नयना चवरीवाल
दहा कि.मी. धावणे- (पुरुष)
हिंमत दाभाडे (कोल्हापूर), दिलीप राऊत (सोलापूर), ज्योतीराम कौलगे (आगाशे कॉलेज)
दहा कि.मी. धावणे- (महिला)
कोमल ढबाले, 2) दीक्षिता पवार, यमुना लडकत (शाहू कॉलेज)
21 कि.मी. धावणे- (पुरुष)
गणेश मांढे (गरवारे कॉलेज, पुणे), सतीश कासळे (डेक्कन, पुणे), सौरभ जाधव (एसएनजीसी कॉलेज)
21 कि.मी. धावणे- (महिला)
यामिनी ठाकरे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर), संपदा बुचुडे (सनस मैदान, पुणे), अश्विनी शिंदे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर) या स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये यश संपादन केले असून गणेगावातील स्थानिक तरुण मंडळे, महिला बचत गट व गावातील आबालवृद्धांनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गणेगाव येथे शिरूर तहसील विभाग, आरोग्य विभाग, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर आणि स्थानिक महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)