गणरायासोबत घुंगरांचेही केले पूजन!

नृत्यांगणा मृण्मयी जोंधळेकर : कुटुंबासोबत गणेशोत्सवासाठी घरी

पिंपरी – “ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमातील विजेती मृण्मयी जोंधळेकर हिने गणरायासमोर ढोलकीच्या तालावरच्या लावणीत विजेत्या ठरलेल्या कार्यक्रमातील घुंगराचे पूजन करून दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. निगडी प्राधिकरण येथील रहिवासी असलेल्या मृण्मयी कुटुंबासमवेत खूप दिवसांनी एकत्र आल्याने घरात गणरायामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे प्रसिध्द नृत्यांगणा व अभिनेत्री मृण्मयी जोंधळेकरने सांगितले.
मृण्मयीने गणेशाच्या आगमनादिवशी घरात तळणीचे मोदक आई सोबत तयार करून गणरायाचे उत्साहात आगमन केले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मृण्मयीच्या घरी शाडू मूर्तीची स्थापना केली आहे.

प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी गणरायाची साध्या पद्धतीने सजावट केलेली आहे. तसेच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य व मोदक गणरायासाठी तयार केले आहेत. सध्या ती कलर्स मराठीवरील मालिका “अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत व्यस्त आहे. “शुटिंग’मधून वेळ काढून मृण्मयी कुंटुंबासोबत सण साजरा करण्यास हजर राहिली. त्यामुळे कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला होता. सध्या मृण्मयी मॉडर्न कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला बीसीए करीत आहे. त्यामुळे तिचा सध्या कॉलेजाचाही अभ्यास सुरू आहे.

मृण्मयीची आई गौरी जोंधळे, वडील महेश जोंधळे, बहीण मधुरा जोंधळे यांच्यासमवेत मृण्मयीने गणेशोत्सवानिमित्त जास्त वेळ घालवला. कुटुंबात एकत्र असलं की, मनशांती मिळते तसेच विविध विषयांवर हितगुज होते. कुटुंबात असलं की विश्रांती मिळते, यासाठी सणासुदीच्या माध्यमातून कलाकारांना कुटुंबासोबत आनंद व्यक्त करण्याचे एक माध्यम मिळते. त्यादृष्टीने सण उत्सव हे महत्वाचे माध्यम आहेत. सर्वांनी एकत्र येऊन अशा उत्सवांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

त्यापुढे मृणमयीने आवर्जून सांगितले की, गणेशोत्सवासारखा मोठा उत्सव कुठेही नाही. सगळ्यात जास्त मज्जा या सणाला येते. टिळकांनी हा गणेशोत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा म्हणून याची सुरूवात केली. मात्र सध्याच्या गणेशोत्सवाला ओंगाळवाणं रूप आलेलं आहे. मोठ्यांने डीजे लावणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे हे अयोग्य आहे. जेव्हा आम्ही “सेलिब्रिटी’ म्हणून एखाद्या कार्यक्रमांना जातो तेव्हा कलाकार म्हणून उत्सवांचा बेरंग करू नका असा संदेश नागरिकांना देतो. नुकत्याच कोल्हापूरच्या महाआरतीला मी उपस्थित होते. तेव्हा देखील त्या ठिकाणी चांगले विचार भाविकांना देण्याचा मी प्रयत्न केला. उत्सव समाजाच्या भल्यासाठी असतात. त्यावेळी इतरांना आपला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच कार्यक्रम साजरे करायला हवेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)