गणरायाच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा सज्ज

जिल्हयात साडेतीन हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) –
इंधन दरवाढ आणि महागाईने होरपळलेल्या शाहूनगरीच्या भकतांना गणरायाच्या स्वागताची आस लागली असून भाविक सज्ज झाले आहेत. सातारा शहरात साडेतीनशे तर जिल्हयात साडेतीन हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फ गणरायाची प्रतिष्ठापना होत असून दहा दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. हेरंब, वक्रतुंड, सिद्धीविनायक, विघ्नहर्ता, अमेय, मंगलमूर्ती अशा अनेक प्रकारचे नामाभिधान लाभलेली ही सर्वांची लाडकी बुद्धीदेवता! अंध:कार दूर करुन प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठीच ती आता दाराशी आली असून वर्षभर प्रतीक्षा करणारे सर्वचजण तिच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत.भाद्रपद शुध्द तृतीयेला घरोघरी मोठ्या उत्साहात हरतालिका पूजन करण्यात आले. गणरायांच्या आगमनासाठी शाहूनगरीसह सर्व जिल्हाच सज्ज झाला असून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शाहूनगरीसह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांच्या बाजारपेठा गर्दीने अक्षरश: फुलून गेल्या आहेत.

दरम्यान, येत्या वीस तारखेला मुस्लीम बांधवांचा मोहरम ताजिया सण साजरा होत आहे या निमित्ताने हिंदू मुस्लीम ऐक्‍याचे दर्शन पुन्हा घडणार आहे. हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये दोन्ही सणांच्यानिमित्ताने उत्साहाचे वातावरण पसरले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला विघ्नहर्त्याच्या स्वागताची सर्वत्र धांदल उडाली होती. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत ईदसाठी म्हणून सुकामेवा तर गणपतीसाठी मखरं, नवीन पाट, नवीन रुमाल आणि केवड्याचे पान व कमळाची फुलं खरेदीसाठी गर्दी झाली होती. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी मोठी लगबग सुरु होती. काही ठिकाणी गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात स्थानिक कारागीर गुंतून गेले होते. शुक्रवारी चॉंद न दिसल्यामुळे शनिवारी साजरी होणाऱ्या ईदसाठी लागणाऱ्या वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी मुस्लीम बांधवांनी मिठाईच्या दुकानात एकच गर्दी केली होती. पोवई नाका, राजवाडा, मोती चौक, राजपथ, खण आळी या ठिकाणी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शुक्रवारी सातारकरांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे शुक्रवारी लाखो रुपयांची उलाढाल झाली. या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. खरेदीसाठी येणाऱ्या लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्यामुळे त्यामध्ये आणखी भर पडली होती. ही वाहतुकीची कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे शहरात आणि महत्वाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अवघ्या सृष्टीचा तारणहार, सुखकर्ता तथा दु:खहर्ता विघ्नविनाशक, गणरायाच्या स्वागताचे वेध शाहुनगरीला लागले आहेत. गणरायाच्या आगमनाला काही तासांचा अवधी उरला आहे. श्रावण महिना संपला की वेध लागतात ते अबालवृध्दांच्या प्रिय गणेशोत्सवाचे. पुण्या-मुंबईच्या गणेशोत्सवाचा लौकिक साऱ्या देशाला माहीत आहे. याच धर्तीवर आता महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात हा उत्सव साजरा होवू लागला आहे. कोकणामधील गणेशोत्सव तर खऱ्या अर्थाने लोकोत्सवच आहे. मुंबईच्या चाकरमानी गणपतीसाठी कोकणात येवून दाखल झाले असून सातारा जिल्ह्यातील अनेक लोक मुंबईत असून ते देखील गणपतीसाठी दाखल झाले आहेत. दरवर्षी सातारा जिल्ह्यात आणि शहरात गणेशोत्सव धार्मिक भक्तिभावासह उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला त्याचा प्रत्यय आला. गणरायाच्या स्वागतासाठी आणि सजावट, देखाव्यांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी झाली होती. यामुळे अवघी शाहूनगरी गणेशमय झाल्याचा प्रत्यय गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येलाच आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. घरोघरीही उत्साहाला उधाण आले होते. मोती चौक, राजवाडा, पोवई नाका, बसस्थानक, नटराज मंदिर चौक परिसरात नागरिकांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केली होती. सजावटीचे साहित्य मिळणाऱ्या दुकानांपुढे नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. राष्ट्रीय महामार्गालतचा नटराज मंदिर चौक परिसर तर गर्दीने फुलून गेला होता. येथील राजस्थानी कारागिरांच्या सुबक, आकर्षक, भव्य परंतु माफक दरात मिळणाऱ्या मूर्तींना ग्रामीण भागातून मोठी मागणी असते. त्यानुसार या भागातील काही मंडळांनी व नागरिकांनी आपल्या मूर्ती ढोल, ताशांच्या निनादात घरी नेल्या.
नटराज मंदिर चौक परिसरात सुमारे 20 पेक्षा अधिक गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स लागले असून घरगुती गणेश मूर्तीपासून ते मंडळांच्या भव्य मूर्तीपर्यंत नानाविध मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 75 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत गणेश मूर्तींच्या किंमती आहेत. सायंकाळी 4 नंतर या परिसरात भक्तांची रीघ लागली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)