गणरायाच्या सजावटीला इमिटेशन ज्वेलरीचा साज

सातारा,  (प्रतिनिधी)
उत्सवातील गौर सोन्याने भरून गेलेली असावी. निदान तशी दिसावी यासाठी बाजारपेठेत खास “इमिटेशन ज्वेलरी’ मोठ्या प्रमाणावर दाखल झाली असून, गणराय आणि गौरीकरिता सोन्या-चांदीच्या खऱ्याखुऱ्या दागिन्यांचीही चलती आहे. सातारकरांचा जास्त कल मात्र, चंदेरी दागिन्यांकडेच आहे.
उत्सवात लाडक्‍या गणरायाला सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी नटविण्यावर नागरिकांचा भर आता वाढू लागला आहे. अनेक कुटुंबांत ही “हौस’ केली जावू लागली आहे. त्यामुळेच बहुतेक सराफांच्या दुकानात प्राधान्याने हे दागिने दिसू लागले आहेत. गणरायाच्या हातातील परशू, सुदर्शनचक्र यासह गळ्यातील विविध प्रकारचे हार, दुर्वा, चांदीची फुले आणि अगदी मुकुटासह उंदीरमामाही उपलब्ध झाले आहेत. तुऱ्याचे, खडे जडविलेले साधे धातूचे मुकुट नागरिक आता आवर्जून घेतात. सोन्याचे दागिने आर्थिकदृष्ट्‌या सुबत्ता असलेले नागरिक आवर्जून करतात, तर अनेक सामान्य नागरिक सोन्याची हौस चांदीवर भागवितात. बहुतेकांचा कल चांदीच्या दागिन्यांकडेच असतो. दुर्वा, मनगटी, चांदीचा मोदक, छोटासा उंदीर, जास्वंदीसारखे फूल अशा 500 रुपयांपासून साधारण दोन हजार रुपयांपर्यंतचे दागिने घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. दुर्वा घेताना नागरिक पाच, सात, 11, 21 अशा पटीत घेतात. त्याचप्रमाणे गणरायाचे आवडते खाद्य मोदकालाही नागरिक पसंती देतात. गणेशाचे वाहन उंदीरही उपलब्ध झाले असून, त्याच्या किंमती अडीचशे रुपयांपासून पुढे आहेत. मुकुटाच्या किमती एक हजारापासून दोन हजारांपर्यंत आहेत. फुले जोडी 400, त्रिशूळ 350, तर मोदक शंभर-दोनशे रुपयांपासून वजनानुसार आहेत. त्याचप्रमाणे केवड्याचे पान, पान सुपारी, नारळ, हार, जानवे असे विविध चांदीचे दागिने उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती म्हसवडकर ज्वेलर्सचे श्रेणिक शहा यांनी दिली.
मात्र, चांदीच्या तुलनेत सोन्याचे दर जास्त असून, त्याचे दागिने सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. फारच थोडे नागरिक ही हौस करू शकतात. त्यामुळे सातारकरांचा भर हा चंदेरी उत्सवावरच जास्त आढळतो. लायटिंगच्या माळा व आकर्षक मखरांनी बाप्पांची शोभा वाढवण्यास सुरवात केली आहे. थर्माकोल सजावटीतून गायब झाल्याने इको फ्रेंडली सजावटीचे साहित्य वीस टकक्‍यांनी महागले आहे. कार्डबोर्ड कार्डशीटला मागणी वाढली असून त्याची मखरे साडेचारशे ते एक हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. देशी बनावटीच्या विद्युत माळा शंभर रूपयांपासून उपलब्ध आहेत.
दरम्यान, गौरीला सजविण्यासाठी अतिशय सुबक इमिटेशन ज्वेलरी वापरण्याकडे महिलांचा कल असून, मोती चौकात फुटपाथलाही विविध गाड्यांवर अतिशय सुंदर आणि स्वस्त ज्वेलरी उपलब्ध झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)