गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!! (प्रभात Open House)

गणेशोत्सव तसं पहिलं तर महाराष्ट्रात सर्वांचा लडका आणि सर्वाधिक उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे आणि तोही दहा दिवस असल्याने सर्वांच्या उत्साहाला गणेशोत्सवामध्ये उधाण येते. श्रावण महीना संपताच गणेशोत्सवाची चाहूल लागते. गणेशोत्सवाच्या आधीच आठवडा भर सर्वत्र लगबगीचे वातावरण मन प्रसन्न करते. तुडुंब गर्दीनी भरलेले रस्ते, रस्त्यांवर मंडळांचे मांडव पडलेले असतात. पुण्याच्या बाजार पेठांमध्ये तर गर्दीचा महापूरच असतो. पण एवढ्या गर्दीतही गणेशभक्त मोठ्या उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाच्या आरासेसाठी साहित्य घेण्याकरता येतात. सर्वत्र दुकानांमध्ये लाडक्या बाप्पांच्या नवनवीन रूपातील मनमोहक मूर्त्या लक्ष वेधून घेतात. त्यामध्ये पेणच्या मूर्ती विशेष.

लहानपणी तर आम्ही गणेशोत्सवात धमाल करायचो. तेव्हा घरच्या घरीच गणपतीची आरास करायचो आणि त्याचा आनंद अवर्णनीय असायचा. त्यात क्रेपच्या कागदाच्या झुरमुळयांच्या माळा कुठे पताके कुठे रंगबिरंगी पडदे असत तर कुठे थर्माकोलची मंदीरेही घरीच केली जात. बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक घरोघरी केले जात. प्रतिष्ठापनेच्या दिवशी तर आम्ही बालचमू कुणी दुर्वा जूडी करण्यात, कुणी फुलांचे हार करण्यात तर कुणी प्रतिष्ठापनेची तयारी करण्यात मग्न असायचो. मनोभावे बाप्पाची प्रतिष्ठापना करून मग उकडीच्या मोदकांवर यथेच्छ ताव मारायचो. आमचे बाल गणेश मंडळाची तयारीही जोरात असायची. आरास सर्व काही आम्ही कार्यकर्ते मिळून उपलब्ध साहित्यात रात्र रात्र जागून करायचो. पण काय मजा होती त्यात. एकदा तर आम्ही विद्युत रोषणाईही आमची आम्हीच केली होती. मोठ्या मंडळामध्ये गेल्यावर विसर्जनाच्या दिवशी आम्हीही नाचायचो. साउंड असायचे, काहीजण झोकून नाचायचे. अगदी बीभत्स पद्धतीने वेडंवाकडं अंग करून मुलं नाचायची नंतर डीजे पर्व आले आणि त्यायोगे ध्वनि प्रदूषणाला सुरुवात झाली. मग प्रशासनाला हस्तक्षेप करून आवाजाच्या पातळीवर नियंत्रण आणावे लागले. आजकल तर ढोल जिम पथकांची वेगळीच टुम सुरू झालीये. अहो स्पीकर्सचा आवाज तर दहा दिवस होता पण हे दीड महिना आधी प्रॅक्टीस करून आजूबाजूच्या लोकांना हैराण करतायत हे ह्यांना कोण सांगणार. तरुण मुले कमी होती म्हणून तरुण मुली सुद्धा त्यांना मदत करायला पुढे सरसावल्यात. पण या सगळ्यात एक ट्रेंड या तरूणाईत पाहायला मिळतोय, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक. असो उत्सवाचं स्वरूप काळानुसार बदलणारच. पण आज थोडे मागे वळुन पाहिल्यावर असे वाटतंय की यापेक्षाही घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा होवू शकतो. सध्या एक छान नवीन ट्रेंड पाहायला मिळतोय तो घरच्या घरी शाडुच्या मातीचा गणपती घरीच बनवण्याचा. त्यायोगे प्रदूषणही कमी होते कारण ह्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळून जातात आणि त्यायोगे पाण्याचे प्रदूषण होण्याचे टळते. सध्या काही पर्यावरणप्रेमी एनजीओज यावर काम करताना दिसताहेत. सार्वजनिक गणेशोत्सवांचे म्हणाल तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तरुण शक्ती असते, धाडाडीचे कार्यकर्ते असतात आणि पैसाही असतो तो आणि या कार्यकर्त्यांची क्रयशक्ती जर समाजोपयोगी गोष्टींसाठी खर्च झाली तर किती चांगले होईल आणि कोण सांगता त्यातूनच समाजाला एक चांगले नेतृत्वही मिळू शकेल.

– श्रीपाद जाधव, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)