गणपतीची इच्छा

(अश्‍विनी महामुनी )
गणपतीचा उत्सव म्हणजे मोठा उत्साहाचा, धामधुमीचा उत्सव. खरं तर हा धार्मिक एक सण आहे. पण त्याचे धार्मिक सण हे स्वरूप बाजूला राहून सामाजिक उत्सव हेच स्वरूप वाढत राहिले आहे. आज गणपती उत्सव-म्हणजे सार्वजनिक गणपती उत्सव सव्वाशे वर्षांचा झाला आहे. या सव्वाशे वर्षात त्याचे स्वरूप आमूलाग्र बदलून गेले आहे. तशीच राहिली ती फक्त गणपतीची मूर्ती. चार हात, सोंड आणि मोठे कान असणारी, एकदंत…. मात्र त्याचे शारीरिक स्वरूप तेच असले, तरी बाह्यस्वरूप मात्र सतत बदलत गेले आहे, जात आहे आणि बदलत राहणार आहे. बाकी गणपतीला आपण जितक्‍या स्वरूपात पाहिले आहे, तेवढे कोणत्याही देवतेला पाहिले आहे. मागे केवळ ओंकारातील गणपतीची 101 रूपे कोणीतरी काढून दाखवली होती. तशीच श्रीमधीलही 101 रूपे दाखवली होती. इतर देवदेवतांच्या स्वरूपातील-अगदी पिता भोलेशंकराच्या रूपापासून ते नटखट बाळकृष्णाच्या आणि साईबाबांपासून ते संतमहंतांच्या, नेतेपुढाऱ्यांच्या रूपातील गणेश पाहायला मिळतो. गेल्या वर्षी मल्हारीची मालिका जोरात होती, तेव्हा मल्हारी मार्तंडच्या रूपातील गणपती आले होते.
गणपती उत्सवातील मंडपांच्या, त्याच्यासमोरील सजावटीच्या आराशीच्या पद्धतीही बदलत गेल्या आहेत. वीज नव्हती, तेव्हा तेलांच्या दिव्यांची आरास व्हायची, मग वेगवेगळ्या विजेच्या दिव्यांची रोषणाई सुरू झाली. आता तर एलईडी आले आहेत. हजारो-लाखो दिव्यांची रोषणाई होते आजकाल. गणपतीसमोर होणाऱ्या प्रबोधनपर कार्यक्रमांची जागा निखळ करमणुकीने घेतली आहे. आणि आजकाल गणपतीसमोर बसून वा उभे राहून दोन-तीन तासांचा कार्यक्रम कोणी पाहतही नाही. तेवढा वेळ आणि तेवढा धीरही नसतो कोणाकडे. धावत पळत एकामागून एक गणपती पाहायचे एवढेच काम. त्यात समाधान काय मिळते, आणि नंतर लक्षात किती गणपती राहतात ? पूर्वी केवळ शाडूच्याच मूर्ती असायच्या. आता शाडू दुर्मीळ झाला आहे. त्याची जागा घेतली आहे प्लास्टर ऑफ पॅरीसने.
या वर्षी सहज दहावीच्या वर्गाला निबंध लिहायला सांगितला, गणपती मला भेटला तर…..म्हटले, बघूया मुलांची कल्पनाशक्ती किती धावते ते.
गणपती मला भेटला तर या विषयावर लिहायला सांगताच मुले फटाफट लिहू लागली. वर्गात एकदम पिन ड्रॉप म्हणतात तशी शांतता पसरली. मी वर्गात फिरून मुले काय लिहितात ते पाहू लागले. तास संपताच सर्वांच्या वह्या तपासायला घेतल्या.
सर्वांनी चांगला दोन दोन पानांचा निबंध लिहिला होता.बहुतेकांनी म्हटले होते, की गणपती भेटला तर मला फार आनंद होईल. त्याच्याशी मी खूप खूप गप्पा मारीन. गणपती विद्यादाता असल्याने सांगीन, की देवा मला खूप खूप बुद्धी दे. माझा नेहमी पहिला नंबर येऊ दे. कोणी म्हटले होते, की गणपतीचा उत्सव दर महिन्याला येऊ दे. कोणी गणपतीला कायमच आपल्या घरी राहायला सांगितले होते. माझा देश खूप सामर्थ्यवान होऊ दे असे एकाने गणपतीकडे मागणे मागितले होते. देशातून दुष्काळ कायमचा दूर कर, कधीही पूर येऊ देऊ नको म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशी मागणे करून एका मुलाने आपल्यातील प्रगल्भता प्रकट केली होती.
प्रत्येकाने गणपतीकडे काही ना काही मागितले होते. मात्र एकादोघांनी गणपतीलाच विचारले होते, की तुला काय पाहिजे ते माग. आणि मग गणपतीची मागणी आपल्या शब्दात मांडली होती.
गणपती म्हणाला, तुम्ही सगळे चांगले वागा. खरे बोला, भांडू नका, स्वार्थ करू नका. एकमेकांना मदत करा. देशसेवा करा. हे आणि असे बरेच काही.
एकाने मात्र अगदी वेगळेच लिहिले होते.
तुम्ही सर्व माझी भक्ती करता. माझी पूजाअर्चा करता, माझा उत्सव साजरा करता याचा मला आनंद आहे. पण हा उत्सव करताना तुम्ही मला काय हवे आहे, याचा विचार करत नाही. माझ्या नावाने तुम्ही तुमचीच हौसमौज करून घेता. खरं तर मला इतक्‍या मोठमोठ्या मांडवांची गरज नाही. इतक्‍या हजारो-लाखो दिव्यांच्या रोषणाईची गरज नाही. अगदी पंच पक्वान्नांच्या नैवेद्याचीही गरज नाही. मनापासून माझी प्रार्थना केली तर मला पोहचते. प्रेमाने दिलेले एक दोन मोदक मला आवडतात. त्यांनी माझे पोट भरते. एवढ्या गर्दीमध्ये मला बेचैन होते. मी वर्षभर राह्तो कैलासावर. तेथे छान गारवा असतो. अतिशय शांतता असते.
पण तुमच्या या उत्सवाच्या काळात एवढी गडबड असते, गोंधळ असतो की इथून पळून जावेसे वाटते. आणि सर्वात जास्त त्रास होतो, तो तुमच्या गाण्याबजावण्याचा. स्पीकर्सच्या वॉल्स लावून तुम्ही जी गाणी लावता ना, त्याने माझे डोके आणि कान दुखू लागतात. तुमच्या दहा-अकरा दिवसांच्या ध्वनिप्रदूषणामुळे पुढे वर्षभर मला त्रास होतो. तेव्हा कृपा करून हा दणदणाट बंद करा एवढीच माझी हात जोडून विनंती आहे.
हा निबंध वाचून मी वही ठेवून दिली आणि विचार करू करू लागले, या लहान मुलाला जे सुचते, ते मोठ्यांना का सुचत नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)