गडकरींनी सरकारला योग्य प्रश्‍न विचारला

राहुल गांधींचे उपरोधिक ट्विट
नवी दिल्ली – आरक्षणाच्या विषयावर बोलताना परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षण दिले तरी देशात नोकऱ्या कोठे आहेत असा प्रश्‍न अलिकडेच उपस्थित केला होता. त्यावरून सरकारवर निशाणा साधताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की गडकरी यांनी योग्य प्रश्‍न उपस्थित केला असून देशातील प्रत्येक नागरीकच आज नोकऱ्या आहेत कुठे असा प्रश्‍न सरकारला विचारत आहे.

गडकरींनीं हीच वस्तुस्थिती हा प्रश्‍न उपस्थित करून मान्य केली आहे असेही राहुल गांधी यांनी सूचित केले आहे. गडकरी यांनी औरंगाबाद मध्ये बोलताना मराठा आणि अन्य जातींना त्यांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण दिले तरी त्यांना देण्यासाठी नोकऱ्या आहेत कुठे असा सवाल केला होता. त्यांनी म्हटले होते की आयटी तंत्रज्ञानामुळे बॅंकांमधील नोकऱ्या कमी होत आहेत.

सरकारी नोकर भरती आधीच बंद आहेत मग नोकऱ्या कुठे आहेत? असे त्यांनी म्हटले होते. एक्‍सलेंट क्‍वेशन गडकरीजी अशी गडकरींना शाबसकी देताना आज प्रत्येक भारतीयच हा प्रश्‍न विचारत आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या ट्‌विट मध्ये राहुल गांधी यांनी गडकरी यांच्या वक्तव्याचे वृत्तपत्रीय कात्रणही जोडले आहे. मोदी सरकारला देशात रोजगार निर्माण करण्यात साफ अपयश आल्याची टीका कॉंग्रेसकडून सातत्याने केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)