गडकरींच्या वक्तव्यांवरून राहुल यांनी साधला निशाणा; गडकरींनीही घेतला ‘यु टर्न’ 

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या मुलाखतीत गडकरी यांनी म्हटले आहे की आम्ही कधी सत्तेवर येऊ याची आम्हाला अजिबात खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही लोकांना भरमसाठ आश्‍वासने दिली. आता लोक आम्हाला जेव्हा जुन्या वक्तव्यांची आठवण करून देतात त्यावेळी आम्ही हसून वेळ निभाऊन नेतो असे गडकरी यांनी या मुलाखतीत म्हटले होते.
मराठी भाषेतील त्यांचा हा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचे इंग्रजी भाषांतरही त्या व्हिडीओत देण्यात आले आहे. त्यावर आपली प्रतिक्रीया नोंदवताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सही फरमाया , जनता भी यही सोचती है की सरकारने लोगों के सपनों और उनके भरोसे को अपने लोभ का शिकार बनाया है. ही मुलाखत मकरंद अनासपुरे यांनी घेतली आहे. सिंचन घोटाळ्यातील आरोपींना गजाआड करू असे आश्‍वासन भाजपच्या लोकांनी दिले होते त्याचे काय झाले असा सवाल गडकरी यांना विचारण्यात आला होता. त्या अनुषंगाने बोलताना त्यांनी हे विधान केले.
त्यांनी यात म्हटले होते की भाजपच्या जाहीरनाम्यात टोलचा विषय घालू नका असा आग्रह मी पक्षाच्या नेत्यांकडे धरला होता. पण त्यावेळी आपण कधी सत्तेत येऊ असे आम्हाला कधी वाटलेच नाही. त्यामुळे नुसते बोलायला काय जाते? म्हणून आम्ही काहीही बोलत राहिलो असे त्यांनी यात म्हटले आहे.
गडकरींचा वक्तव्यावरून घुमजाव
दरम्यान, नितीन गडकरी यांनी मोदी किंवा 15 लाखांच्या आश्वासनाबाबत आपण काही बोललोच नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी राहुल गांधींना देखील चिमटा काढत, “मुलाखत मराठीमध्ये होती, राहुल गांधींना कधीपासून मराठी यायला लागलं?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)