गडकरींचा धडाका (अग्रलेख)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दिल्ली ते मेरठ या देशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचे उद्‌घाटन झाले. केवळ 500 दिवसांत हा 135 किमीचा महामार्ग उभारण्यात आला असून एकदा एखाद्या सरकारी विभागाने मनावर घेतले की, कितीही मोठे काम किती अल्पवेळात आणि किती दिमाखात उभे राहू शकते, याची झलक या प्रकल्पातून पहायला मिळाली आहे. “हरित महामार्ग’ या संकल्पनेतून हा महामार्ग तयार करण्यात आला असून या महामार्गावर विकसित देशांत असणाऱ्या सर्व सुविधा बाग-बगीचांसह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करणे आवश्‍यक आहे.

केंद्रात आज जे मंत्री कार्यरत आहेत, त्यात गडकरींच्या कार्यशैलीची सर्वत्र वाहवा होताना दिसते आहे. त्यांच्या इतका धडाकेबाज आणि आत्मविश्‍वासाने काम करणारा मंत्री सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात दुसरा नाही. गडकरी संसदेत बोलायला लागले की त्यांच्यातील विकासाची व्हिजन थक्‍क करायला लावते. त्यांच्या कार्यशैलतील आत्मविश्‍वासही त्यांच्या बोलण्यात डोकावतो. नुसतीच भाषणबाजी हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या कार्याचा आवाका आणि क्षमता मोठी आहे. त्याचा मोदी सरकारकडून पुरेपूर उपयोग करून घेण्यात आला नाही; किंवा त्यांना म्हणावा तितका वाव दिला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना पूर्ण मोकळीक आणि पैशाची उपलब्धता करून दिली गेली असती तर गेल्या चार वर्षात देशातील विकासाचे चित्र गडकरींनी खऱ्या अर्थाने बदलून दाखवले असते.

 

गडकरींची एकूण कार्यशैली आणि त्यांची क्षमता पाहिली की हा मराठी माणूस पंतप्रधान झाला असता तर देशाचे चित्र पालटू शकला असता, असे वाटल्याखेरीज राहात नाही. भाजपच्या अंतर्गत राजकारणात गडकरींसारख्यांना या पदापर्यंत पोहचता येण्याची शक्‍यता कितपत आहे, याची शंका आहे, पण ती वेळ भविष्यात कधी तरी यावी असे मराठी मनाला वाटल्यावाचून राहात नाही. मोदी सरकारच्या चार वर्षातील एकूणातल्याच निराशाजनक कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर एकट्या गडकरींच्या कामाने सरकारला तारले आहे, हे यानिमित्ताने मान्य करावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण देशाचे ते सुदैव नव्हते. गडकरी त्यांच्या परीने कुठेही कमी पडले नाहीत; पण त्यांना आवर घातला गेला आणि त्यांची भरारी रोखून धरलेली दिसली. गडकरींनी महामार्ग विकासाखेरीज बंदरे आणि सागरी प्रकल्पांच्या उभारणीसाठीही मोठी धावाधाव या चार वर्षाच्या काळात केली. त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून विविध प्रकल्पांची आखणी केली. त्यांच्या विकास विषयक संकल्पना विलोभनीय आहेत आणि कामाचा झपाटा थक्‍क करणारा आहे. पण “मोदी विरुद्ध गडकरी’ यांच्यातील सुप्त संघर्षामुळे गडकरींचे अनेक प्रकल्प आज केवळ कागदावरच राहिले आहेत; त्या प्रकल्पांना म्हणावी तशी गती मिळालेली नाही, हेही तितकेच खरे आहे.

मोदींच्या दबावाला न जुमानता स्वत:च्या शैलीने काम करणारे ते एकमेव केंद्रीय मंत्री आहेत. त्यांची ही स्वतंत्र कार्यशैली लोकांच्याही लगेच लक्षात येते. आज कोणत्याही मंत्रालयाच्या जाहीरातीत केवळ नरेंद्र मोदींचेच फोटो दिसतात; पण गडकरींच्या मंत्रालयाच्या जाहिरातीत केवळ एकट्या गडकरींचेच फोटो अनेक वेळा बघायला मिळाले आहेत. मोदींशी असा उघड पंगा घेणारे ते एकमेव मंत्री असावेत. मोदींच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी स्वत:चे वेगळेपण जपले आहे, हेही कालच्या “ईस्टर्न पेरीफेरीयल एक्‍स्प्रेस वे’च्या उद्‌घाटन कार्यक्रमात पहायला मिळाले. हा कार्यक्रम गडकरींनी त्यांच्या स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी ठेवला. वास्तविक, त्याच्या आदल्या दिवशीच मोदी सरकारचा चार वर्षांच्या पूर्णत्वाचा दिवस होता. पण या महामार्गाच्या उद्‌घाटनासाठी हा दिवस मुद्दाम टाळला गेला.

यातील गोम अनेकांच्या लक्षात आल्याखेरीज राहिली नाही. उद्‌घाटनाच्या निमित्ताने मोदींनी या महामार्गावरून उघड्या जीपमधून मिरवणूक काढली. या मिरवणुकीतही गडकरींची स्वतंत्र उघडी जीप मोदींच्या बरोबरीनेच धावली, हा वेगळेपणाही गडकरींच्या स्वत:च्या कार्यशैलीची झलक दाखवणारा ठरला. अन्यथा मोदींच्या बरोबरीने स्वतंत्र गाडीतून फेरी मारण्याची धमक अन्य कोणत्या मंत्र्याने दाखवली असती? थोडक्‍यात, मोदींच्या दबावाखाली न वागणारा हा धडाकेबाज मंत्री आहे. अर्थात राष्टीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्यानेच गडकरी हे स्वत:चे वेगळेपण टिकवून ठेवण्याचे धाडस दाखवू शकतात, ही बाबही लक्षात घ्यावी लागेल. “मोदी-गडकरी’ यांच्या अतंर्गत राजकारणाशी सामान्यांना देणे-घेणे नाही.

गडकरींना मोकळेपणाने काम करू दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा मात्र सामान्य माणूस निश्‍चित व्यक्‍त करीत असणार. गडकरींची संसदेतील भाषणे ऐकणे ही सुद्धा एक वेगळीच औत्स्युक्‍याची बाब असते. मध्यंतरी संसदेतील एका भाषणात ते विकासाच्या एकूणच संकल्पनेची आणि लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेतील फरकाची फिलॉसॉफिकल मांडणी करताना दिसले. ते म्हणाले की, “आज माझ्याकडे जे संसद सदस्य येतात, त्यातील बहुतेक सदस्य हे एखाद्या कामाला विरोध करण्यासाठीच येत असतात. अमूक एखादे काम करा असा प्रस्ताव घेऊन येणारे फार कमी असतात. माझ्याकडे प्रकल्पाच्या विरोधातील तक्रारी घेऊन येऊ नका; उलट माझ्याकडे मोठमोठया कामांचे प्रस्ताव घेऊन येत चला,’ हे त्यांनी लोकप्रतिनिधींना केलेले आवाहन त्यांच्यातील वेगळेपण सिद्ध करणारे आहे.

गडकरींची एकूण कार्यशैली आणि त्यांची क्षमता पाहिली की हा मराठी माणूस पंतप्रधान झाला असता तर देशाचे चित्र पालटू शकला असता, असे वाटल्याखेरीज राहात नाही. भाजपच्या अंतर्गत राजकारणात गडकरींसारख्यांना या पदापर्यंत पोहचता येण्याची शक्‍यता कितपत आहे, याची शंका आहे, पण ती वेळ भविष्यात कधी तरी यावी असे मराठी मनाला वाटल्यावाचून राहात नाही. मोदी सरकारच्या चार वर्षातील एकूणातल्याच निराशाजनक कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर एकट्या गडकरींच्या कामाने सरकारला तारले आहे, हे यानिमित्ताने मान्य करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)