गटारीनिमित्त बारा टन मासळी, 450 टन चिकन आणि दोन हजार बकऱ्यांच्या मटणाची विक्री

 शनिवार मांसाहार करत नसल्याने शुक्रवारीच पुणेकरांनी साजरी केली गटारी

पुणे – शहरात दहा ते बारा टन मासळी, 400 ते 450 टन चिकन आणि सुमारे दीड ते दोन हजार बकऱ्यांचे मटण फस्त करत पुणेकरांनी शुक्रवारी गटारी साजरी केली. हॉटेल, पार्ट्यांपेक्षा घरातच गटारी साजरी करण्यात पुणेकरांनी पसंती दिली. आषाढ महिना शनिवारी संपत आहे. मात्र, शनिवारी अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यातच शुक्रवारीही गटारी अमावस्या सुरू झाली आहे. त्यामुळे शुक्रवारीच पुणेकरांनी गटारीचा बेत आखला होता. रविवारपासून श्रावण महिना सुरू होतो. त्यानंतर गणेश उत्सव, नवरात्र उत्सव असतो. या काळात मांसाहार केला जात नाही. त्यामुळे गटारीला आवजून मांसाहार केला जातो. त्यानुसार शुक्रवारी गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण मार्केट, पौड फाटा येथील मासळी बाजार, लष्कर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट येथील बाजारात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले, मासळी बाजारात शुक्रवारी दहा ते बारा टन मासळीची विक्री झाली. पाऊस ओसरल्यानंतर पश्‍चिम किनारपट्टीवरून बाजारात मासळीची आवक होत आहे. मागणी जास्त असली तरीही आवक अधिक झाल्याने रविवारच्या (दि. 5 ऑगस्ट) तुलनेत भाव स्थिर होते. घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीला मागणी होती. चिकनाही अधिक मागणी असल्याचे सांगून व्यापारी रुपेश परदेशी म्हणाले, शुक्रवारी शहरात तब्बल चारशे ते साडेचारशे टनाची विक्री झाली. घरगुती आणि हॉटेल व्यावसायिकांकडून चिकनची खरेदी झाली. मागणीच्या तुलनेत पुरवठाही अधिक असल्याने भाव स्थिर होते. तर मटण विक्रेता दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, गटारीला अपेक्षित मागणी नव्हती. तरीही नेहमीच्या तुलनेत जास्त मागणी होती. खरेदी करणाऱ्यांमध्ये विशेषत: घरगुती ग्राहक जास्त होते. शहरात सुमारे दीड हजार ते दोन हजार बकऱ्यांच्या मटणाची विक्री झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)