गटर दुरुस्तीमुळे वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर

शहरातील मुख्य चौकातच कासवगतीने सुरु आहे काम

वाई, दि. 10 (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य असणाऱ्या किसनवीर चौकात पालिकेने ड्रेनेजसाठी नव्याने गटर बांधण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, कासवगतीने सुरु असलेल्या या कामामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, पालिकेकडून या कामाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे की काय? अशा संतप्त प्रतिक्रियादेखील नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
वाई शहरातील किसनवीर चौकात नगरपालिकेचे रस्ता क्रॉसिंग ड्रेनेज गटराच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाईच्या भाजी मंडईत तर दोन भाग झाल्यासारखी अवस्था ड्रेनेजच्या गटर दुरुस्तीच्या कामामुळे झाली आहे. वाईकर नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांमुळे वाई शहरातील वाहतुकीची कोंडी ही नागरिकांच्या पाचवीला पुजलेली आहे. त्यातच पालिकेकडून वारंवार रस्त्यांची अथवा गटारांची कामासाठी खोदकाम केले जात असल्याने वाहतूक कोंडीत चांगलीच भर पडत आहे. किसनवीर चौक हा अतिशय रहदारीचा चौक असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी असते. पोलिसांनाही या चौकात तारेवरची कसरत करावी लागते. वाहतूक आराखड्याला मंजुरीचे कारण पुढे करत पोलीस व पालिका प्रशासन चालढकल करीत असल्याने वाईकर नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा वाई शहरातील रस्त्यावर झालेल्या बेसुमार अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. माल भरलेली अवजड वाहने कधीही कोठेही माल उतरविण्यासाठी उभी असतात. त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो.
वाहनधारकांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार-चाकी, दुचाकी वाहने पार्क केली जात आहे. याशिवाय व्यापारी, विक्रेत्यांकडूनही रस्त्यावरच अनेकठिकाणी अतिक्रमणे केली असल्याने पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍किल झाले आहे. पालिका व पोलीस प्रशासनानेही याकडे साफ दुर्लक्ष केल्याने वाईकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)