नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर यूध्दाभ्यास करून आपल्या सामर्थ्याचा साक्षात्कार दाखवला आहे. भारत आपल्या हवाई दलाची क्षमता सतत वाढवत आहे. तीन दिवसांच्या गगनशक्ती 2018 या युध्दाभ्यासात भारातीय लढाऊ विमानांनी सुमारे 5000 उड्डाणे केली. तेजस, सुखोई-30, मिग, जाग्वार, मिराज आदी 1100 विमाने-हेलिकॉप्टर्सनी या युद्धाभ्यासात उड्डाणे भरली. त्यात 300 अधिकारी आणि सुमारे 15,000 जवान सहभागी झाले होते.
सध्या युद्धसदृश कोणतीही परिस्थिती नाही. पण तरीही पाकिस्तान आणि चिनी सीमांवर आपल्या हवाई सामर्थ्याची परीक्षा घेण्यात कोणतीही कसर सोडायची नाही, असे हवाई दलाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यासाठीच पश्चिम सीमांवर युद्धाभ्यास केल्यानंतर हवाई दलाची फायटर जेट्स आता पूर्व सीमांवर झेपावत आहेत. 30 सुखोई विमानांच्या ताफ्याने 2500 किमी अंतर पार करत पश्चिमी तटावरील अनेक लक्ष्यांचा भेद केला. एका मिशनने सुमारे 4000 किमी उड्डाणे केली आहेत. आयएल 78 फ्लाईट रिफ्युएलिंग (हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणाऱ्या) विमानांच्या साह्याने हे शक्य झाले असल्याचे हवाई दलाने सांगितले आहे.
सन 1986-87 चे ऑपरेशन ब्रास्टॅक्स आणि सन 2001-02 चे ऑपरेशन पराक्रम नंतरचा हा सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे. तेव्हा संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानशी युद्धास सज्ज झाला होता.
गगनशक्ती 2018 युद्धाभ्यासाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी प्रथमच महिला फायटर पायलट्स सहभागी झाल्या आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा