गंधतृण गवती चहा

धुक्‍यात लपेटलेली बोचरी थंडी, गार वारं .. रिमझिमता पाऊस.. अशी हवा पडली की गवती चहाच्या वाफाळत्या चहाची तलफ न येणारा माणूस विरळाच! थंडी, पाऊस सुरु झाला की घरात गवती चहा, आलं, तुळस यांचं आगमन झालंच म्हणून समजा. गवती चहाचं महत्त्व आहेच तेवढं मोठं. अनेकदा आपण भाजीवाल्याकडून थोडा गवती चहा विकत घेऊन येतो, खास चहाच्या स्वादासाठी. पण हाच गवती चहा आपल्या घरी कुंडीतही विराजमान होऊ शकतो, आणि उपयोगीही ठरतो.. त्याच्या खूपशा औषधी गुणांनी !
इंग्रजीत गवती चहाला ङशोपसीरीी म्हणून ओळखलं जातं, ते त्याच्या लिंबासारख्या वासामुळे. याचं शास्त्रीय नाव आहे उूालिेसशप उळीींर्रीीींआणि कूळ आहे झेरलशरश / ीराळपरश ीरीी षराळश्रू. गवती चहाची देशी नावं तर त्याच्या वासाशी जवळीक साधणारी आणि तेवढीच सुंदर आहेत. संस्कृतमध्ये त्याला रोहीशम्‌, जाम्बिरात्रूण, अतिगंध, सुगन्धा, गुह्यबीजा, भूतिका, गुच्छला इ. अनेक नावांनी ओळखलं जातं. तर हिंदीत गंधतृण, हरीछाया. मराठीत हिरवा चहा, गवती/ पाती चहा. गवती चहाला आयुर्वेदातही महत्त्वपूर्ण मानलं आहे. याची पाने, खोड, तेल सर्व औषधी असतात. मुख्यतः सर्दी, ताप, खोकला झाला की किंवा होऊ नये म्हणून गवती चहाचा काढा घेतला जातो. पण इतकंच नाही तर अनेक आजारांवर याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. भारतभर आढळणाऱ्या गवती चहाच्या तेलाचा उपयोग जंतूनाशक म्हणून फंगस किंवा बॅक्‍टेरिअल संसर्गावर केला जातो.
पोटाच्या अनेक आजारात उदा. पोटदुखी, पोटशूळ, उलटया, गॅसेस, कॉलरा, अपचन इ. गवती चहामुळे पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे पित्तही वाढत नाही. गॅसेसमुळे पोट दुखत असेल तर गवती चहाने पोटातील गॅस शौचमार्गाने बाहेर पडून जातो आणि वेदना थांबते. मासिक पाळी नियमित येण्यासाठी गवती चहा उपयुक्त आहे. परंतु हा त्याचा गुणधर्म लक्षात घेऊन, गर्भार स्त्रीने गवती चहा टाळावा. कारण त्यामुळे गर्भपात होण्याची शक्‍यता असते. तसेच अंगावर बाळाला पाजणाऱ्या स्त्रियांनीदेखील गवती चहा घेऊ नये. गवती चहामुळे घाम येतो, त्यामुळे तापावर हा उत्तम मानला जातो.
गवती चहाचे तेल अतिशय गुणकारी आहे. पानांपासून उर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसिन आणि निरोल हे घटक असतात. हे तेल सारक, उत्तेजक व शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात इ. आजारांवर उपयुक्त आहे. हे तेल सुगंधी व सौंदर्यवर्धक आहे. म्हणून सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि अत्तर म्हणूनही याचा वापर केला जातो. साठवणीच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात. गवती चहा असलेल्या ठिकाणी डास, माश्‍या अजिबात फिरकत नाहीत. त्यामुळे डासांना रोखण्यासाठी गवती चहा अतिशय उपयोगी आहे.
गवती चहामध्ये जीवनसत्त्वं बी-पाच, बी-वन, आणि बी-सहा असतात. तर मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज, लोह, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम या धातूंनी तो समृद्ध असतो. गवती चहाचा सेन्ट्रल नर्व्हस सिस्टीम वर चांगला फायदेशीर परिणाम होतो. त्यामुळेच गवती चहा प्यायल्याने थकवा दूर होतो. मनाला, शरीराला तरतरी येते व एकदम ताजेतवाने वाटते. तणाव दूर करण्याची शक्ती याच्यात आहे. गवती चहा खरुज, संधिवात, हत्तीरोग, लिखा आणि गोलकृमी इ. रोगांमध्ये बाहेरून लावल्यास अधिक परिणामकारक ठरतो. गवती चहामुळे पायांत गोळे येणे, स्नायूदुखी यावर मात करता येते व रक्ताभिसरण सुधारते.
काही अभ्यासकांच्या मते गवती चहातील सिट्रल या घटकामुळे कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात आणि त्याचबरोबर इतर निरोगी पेशींना मात्र काहीही हानी पोहोचत नाही. याचा अर्थ असा नाही की केवळ गवती चहाच्या सेवनाने कॅन्सर बरा होऊ शकतो. परंतु कॅन्सरच्या उपचारात याची मदत पूरक होऊ शकते. गवती चहा स्वादुपिंडावर चांगला परिणाम करत असल्याने मधुमेही रोग्यांमध्ये रक्तातील साखर कमी करायला हा उपयुक्त ठरतो. गवती चहाची पाने लोहाने समृद्ध असतात, त्यामुळे लोहाची कमतरता असेल तर विविध प्रकारचा ऍनिमिया दूर करण्यासाठी गवती चहाचे सेवन उपयोगी पडते. हा पोटॅशियमने समृद्ध असल्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी गवती चहाचे नियमित सेवन करावे. गवती चहात असलेल्या मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फोलेटमुळे मेंदूसाठी आवश्‍यक ते घटक यातून मिळतात. त्यामुळे मेंदूची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि क्षमता वाढण्यास मदत होते. गवती चहाच्या सेवनाने शरीराची शुद्धी होण्यास चालना मिळते आणि नको असलेली विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया इ. अनेक देशांमध्ये याच्या सुवासामुळे सूप्स, सॅलड्‌स, चहा अशा विविध पदार्थांमध्ये गवती चहाचा वापर केला जातो. तर मग, आता आपल्या कुंडीत तुम्ही गवती चहा नक्कीच लावणार ना !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)