गंगा महाआरतीने उजळला इंद्रायणीचा घाट

निगडी – आळंदी आणि देहु तीर्थक्षेत्रातून विठुरायास समर्पित अभंग ऐकत वाहणाऱ्या इंद्रायणी नदीने छठी मईया आणि सुर्याचे स्तवन करणारी हिंदी व भोजपुरीतील लोकभक्‍ती गीते देखील ऐकली. गंगा नदीप्रमाणेच जीवनदायिनी इंद्रायणी नदीने देखील महाआरती छठ्‌ पूजेत अनुभवली. हजारोंच्या संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यात असलेल्या उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या श्रद्धेने इंद्रायणी पात्रात उभे राहून प्रत्यक्ष दिसणाऱ्या सुर्यदेवास अर्घ्य अर्पण केले. छठ्‌ व्रतींसाठी विश्‍व श्रीराम सेनेने आयोजन केले होते.

राष्ट्र निर्माणचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश चव्हाणके, शामजी महाराज राठोड, प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, पृथ्वी प्रसाद, धनंजय गुप्ता, शाम बाबु गुप्ता, विकास गुप्ता, सत्यम गुप्ता, रोहित प्रसाद, उमेश सिंह, हरिकेश सिंह, सुनिल सिंह यावेळी उपस्थित होते.

-Ads-

सुरेश चव्हाणके यांना राष्ट्रीय एकता व शामजी महाराज राठोड यांना हिंद भूषण पुरस्कार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, अंबिकालाल गुप्ता, धनंजय आल्हाट, शिवसेना जिल्हाध्यक्ष राम गावडे, संजय वाबळे यावेळी उपस्थित होते.

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात होणारे छठ्‌ व्रत पिंपरी-चिंचवड शहरातही मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येते. दोन दिवसांच्या नहाय-खाय, खरना विधीनंतर तिसऱ्या दिवशी छठ्‌ व्रतींनी नदीच्या पाण्यात उभे राहून मावळत्या सुर्यास अर्घ्य दिले. कोणतेही मंत्र-तंत्र, मुहुर्ताच्या बंधनात न अडकलेल्या या लोकआस्था पर्वासाठी खूप मोठ्या संख्येने व्रती इंद्रायणी नदीच्या काठी आले होते. कुटुंबासाठी हे व्रत करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय होती.
विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की, छठ्‌ पूजा म्हणजे निसर्गाची पूजा. आपल्या संस्कृतीत सूर्य उपासनेसाठी हे व्रत केले जाते. यातून प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. ही प्राचीन काळापासूनची धारणा आहे. निसर्ग आणि समाजात एकात्मता साधणारा हा सण आहे. आपापसात एकमेकांविषयी आस्था, प्रेम, विश्वास आणि निसर्गाविषयीची समर्पणाची भावना वृध्दिंगत व्हावी, ही भावना या व्रतामागे आहे. मनुष्य जीवनामध्ये जंगल, वने, जमीन, पाणी याला फार महत्त्व आहे. नद्यांमुळे आपले जीवन सुखी व समृध्द होते. नदी, नदी परिसर, घाट या सर्वांविषयी कृतज्ञता आणि आत्मीयता शिकवणारा हा सण आहे. समाजात एकता, बंधुभाव, प्रेम, शांती निर्माण व्हावे. सर्व सण या माध्यमातून जोडले जावेत. यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये विश्व श्रीराम सेनेच्या वतीने गंगा महाआरतीचे आयोजन केले जाते. उत्तर भारतीय व महाराष्ट्रीय बांधव मिळून-मिसळून हा सण साजरा करतात. महाराष्ट्रीयन बांधवांचे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दरवर्षी उत्तम सहकार्य लाभते.

मंगळवारी दुपारपासूनच भाविक पूजेसाठी ऊस, दुरडी, सूप, सर्व फळांचा प्रसाद, आरतीचे साहित्य घेऊन आले होते. गटा-गटाने आपल्या परिवार, नातेवाईक मित्रांसमवेत छठ्‌ महापूजा करून इंद्रायणी माता महाआरतीत सहभाग घेतला. यानिमित्ताने एकमेकांचे स्वागत करून शुभाशीर्वाद व शुभेच्छा देत होते.

छठ्‌ पूजेपूर्वीच उत्तर भारतीय बांधव, स्थानिक आणि प्रशासनाने संयुक्‍तपणे घाट व नदीची स्वच्छता केली होती. पूजेसाठी संपूर्ण घाट सुंदर सजवला होता. वाद्याने वातावरण मंगलमय झाले होते. छठ्‌पूजा बांधून केशरी रंगाने घाट सजवण्यात आले होते. महिलांच्या हस्ते पूजा होत होती. ऊस, केळी, नारळ, मोसंबी, सीताफळ, अननस, फुले, पाने, धूप, अगरबत्ती इ. पूजा साहित्य दुरडीमध्ये ठेवून व्रतींच्या डोक्‍यावर ठेवून आणत होते. मनोकामना पूर्ण झालेले भाविक बॅंड वाजवून आनंद व्यक्‍त करत होते. गंगा महाआरतीचे आयोजक लालबाबु गुप्ता यांच्या परिवाराने देखील बॅंड वाजवून यावेळी आनंद व्यक्‍त केला. महाआरतीची जय्यत तयारी करण्यात आली होती. घाटावर विश्व श्रीराम सेनेचे ध्वज लावण्यात आले होते. आळंदी येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)