गंगथडीची मुलूख मैदानी तोफ विठ्ठलराव (भाऊ) लंघे पाटील…

नगर जिल्ह्यातील गोदावरी पट्टा हा मुबलक पाणी व उसाचे मोठ्या प्रमाणात असलेले क्षेत्र यामुळे बागायती भाग म्हणून ओळखला जातो. अशा या भागामध्ये डावी विचारसरणी रुजवण्यासाठी स्व. वकिलराव लंघे (अण्णा) यांनी काम केले. स्वर्गीय अण्णांची डावी विचारसरणी दीनदलित व सर्व जाती-धर्मांच्या लोकांच्या विश्‍वासावर सलग दहा वर्षे विधानसभेचे नेतृत्व करून साधा पायी चालणारा व तालुक्‍यासह जिल्हात एसटी बसने प्रवास करून साधी राहणी व उच्च विचार जपणारा आमदार संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ठरला. अशा महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन त्यांचाच वारसा तेवत ठेवणारे, जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, गोरगरीबांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे, गंगथडीची मुलूख मैदानी तोफ म्हणजे विठ्ठलराव (भाऊ) लंघे पाटील. 

अतिशय कमी वयामध्ये भाऊ 1991 ला बाजार समितीची निवडणूक लढवून सर्वात जास्त मतांनी निवडून आले व कमी वयामध्ये व्हा. चेअरमनपदी निवड झाली. आपल्या कार्यामुळे बाजार समितीच्या चेअरमनपदाची संधी मिळाली. नंतर कॉंग्रेस पक्षाकडून कुकाणा जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवली व तरुण वयातच जिल्हा परिषदेत प्रवेश केला. नंतर सलग पाच वेळेस जिल्हा परिषदेला निवडून येऊन विक्रम केला. 2004 व 2009 साली भाजपाच्या तिकिटावर जनसामान्य माणसाला सोबत घेऊन धनदांडग्यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली व अल्प मतांनी पराभव झाल्याने भाऊंना आमदारकीने हुलकावणी दिली. तरीही खचून न जाता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहिले.गोरगरीबांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, पाण्यासाठी रस्तावर उतरून आंदोलन केले.

2009 चा पराभव झाल्यानंतर अजितदादांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटामधून प्रचंड मतांनी निवडून येऊन 2012 ला जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन भाऊ नामदार झाले. जनतेच्या मनातील आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन नामदार झाल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. भाऊ अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेला आघाडी सरकारच्या काळात प्रथमच मोठा निधी मिळवून दिला. नेवासा तालुक्‍यासाठी भाऊंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झुकते माफ दिले. शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, रस्ते, समाजकल्याण, धार्मिक क्षेत्र, अशा विविध रूपाने कोट्यवधींची विकासकामे तालुक्‍यात झाली. वाकडी गावामध्ये एकाच नदीवर आठ ते नऊ बंधारे बांधून गावातील हजारो एकर शेती ओलिताखाली आणली, गाव टॅंकरमुक्त झाले. नेवासा तालुक्‍यातील अनेक तीर्थक्षेत्रांचा “क’ वर्गात समावेश करून मोठा निधी मिळवून दिला. वाड्या-वस्त्यांवर जाणारे रस्ते, गावासाठी पाणीपुरवठा, आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा गेल्या दहा वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लावून सहा कोटी रुपयांचा दवाखाना इमारत व वसाहतींचे काम प्रगतिपथावर आहे. नेवासा तालुका, गावातील व परिसरातील लोकांच्या सुख: दुखात नेहमी हजर असलेले भाऊ जनमाणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुकाणा जिल्हा परिषद गटामधून मुलगी डॉ. कु. तेजश्रीला प्रचंड मतांनी निवडून दिले व कमी वयामध्ये जनतेच्या सेवेसाठी काम करण्याची संधी दिली. स्व. वकिलराव (अण्णा) लंघे यांच्या विचाराचा वारसा जोपासण्याचे काम विठ्ठलराव (भाऊ) लंघे करत आहे. पाच वेळेस जिल्हा परिषद सदस्य, एक वेळा अध्यक्ष, दोन राष्ट्रीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व इतर महत्त्वाची पदे भोगलेल्या भाऊंना आमदारकीने जरी हुलकावणी दिली असली तरी खचून न जाता मोठ्या उमेदीने तळागाळातील गोरगरीब, उपेक्षितांची, शेतकऱ्यांची बाजू परखडपणे शासन दरबारी मांडण्यासाठी, प्रसंगी कठोर भूमिका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा नेता म्हणून आजही घराघरात व मनामनात भाऊंना आदराचे स्थान आहे. शिरसगाव व परिसरातील कुटुंबांचे कोणतेही प्रश्न पोटतिडकीने सोडवतात. शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभावामुळे परक्‍यांनाही आपलेस करणारे विठ्ठलराव लंघे हे सर्वांचे भाऊ म्हणून परीचित आहे. आपल्या परखड विचारसरणीतून सत्तेत असो वा नसो परंतु, सर्वसामान्य जनतेची कामे तडकाफडकी मार्गी लावण्यासाठी शासनावर तोफ डागण्याची वेळ आली तरी मागे न पहाणारे भाऊ खऱ्या अर्थाने गंगथडीची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. दोन वेळेस विधानसभेचा पराभव व त्यानंतर नामदार म्हणून केलेली विकासकामे, तिसऱ्या वेळेस आमदार म्हणून निश्चित विधानसभेत प्रवेश करतील हीच अपेक्षा.

 

 

– सचिन दसपुते

वार्ताहर, गोपाळपूर, ता. नेवासा 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
19 :thumbsup:
7 :heart:
1 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)