खो-खो स्पर्धेत मोहटेच्या रेणुका विद्यालयाची बाजी

पाथर्डी – तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पाडल्या. स्पर्धेत तालुक्‍यातील एकूण 71 संघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मुलांच्या लहान व मुलींच्या मोठ्या गटात तालुक्‍यातील मोहटे येथील रेणुका विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. तालुका क्रीडा प्रमुख रामदास दहिफळे व सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.

तालुकास्तरीय पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्‌घाटन गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जैन विद्यालयाचे प्राचार्य बी. टी. फुंदे, अजय भंडारी, संतोष चोरडिया आदी उपस्थित होते. या स्पर्धेत तालुक्‍यातील विविध विद्यालयातून एकूण 71 मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 14, 17, 19 वर्ष वयोगटातील मुलांचे 42 संघ तर मुलींचे 29 संघ सहभागी होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : 14 वर्षे मुले प्रथम- रेणुका विद्यालय मोहटे, द्वितीय-प्रवरा माध्यमिक विद्यालय भुतेटाकळी. 14 वर्षे मुली प्रथम- छत्रपती शिवाजी विद्यालय कासारपिंपळगाव, द्वितीय-न्यु इंग्लिश स्कुल, कोरड़गाव. 17 वर्षे मुले प्रथम-कानिफनाथ विद्यालय, जवखेडे, द्वितीय-रेणुका विद्यालय मोहटे. 17 वर्षे मुली प्रथम-जवाहर विद्यालय, चिंचपुर इजदे, द्वितीय-छत्रपती शिवाजी हायस्कूल, मिरी, 19 वर्षे मुले प्रथम- बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी, द्वितीय-रेणुका विद्यालय मोहटे, 19 वर्षे मुली प्रथम- रेणुका विद्यालय मोहटे, द्वितीय-छत्रपती शिवाजी हायस्कूल मिरी. हे संघ प्रथम व द्वितीय क्रमांकाने विजयी ठरले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सूर्यभान दहिफळे, अजय शिरसाट, पप्पू शिरसाट, किशोर पडोळे, रमेश मोरगावकर, विक्रम नेहुल, बाळासाहेब खेड़कर, छबुराव फुंदे, नारायण शिरसाट यासह आदी क्रीडा शिक्षकांनी काम पाहिले.तालुका क्रीडा प्रमुख रामदास दहिफळे व तालुका उप प्रमुख अविनाश घुगे यांनी विशेष जबाबदारी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)