एका महिन्यात 10.94 पैशांनी डिझेल स्वस्त झाल्याने दिलासा
चार लाखाने दैनंदिन डिझेल खर्च झाला कमी
– गणेश राख
पुणे – सातत्याने इंधनदरात होणाऱ्या वाढीने आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेल्या पीएमपीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरात पीएमपीला मिळणाऱ्या डिझेलदरात तब्बल 10 रुपये 94 पैशांनी घट झाल्याने रोज सुमारे 4 लाखाने दैनंदिन खर्च कमी झाला आहे. ताफ्यातील बसेसाठी रोज 38 हजार लीटर डिझेल लागणाऱ्या पीएमपीला मागील चार महिन्यात इंधनदरवाढीचा मोठा फटका बसला. मात्र, महिन्याभरापासून सातत्याने यात होत असलेल्या कपातीने दिलासा मिळाला आहे.
जुन्या गाड्यांची वाढती संख्या, घटते प्रवासी आणि दुसरीकडे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढल्याने दरवर्षी तोट्याच्या गर्तेत अधिकाधिक खोल जाणाऱ्या पीएमपीचा पाय मागील काही महिन्यांत आणखी खोलात गेला. सप्टेंबर या एकाच महिन्यात लिटरमागे तब्बल 6 रुपये 25 पैशांनी झिझेल महागल्याने पीएमपीचे आर्थिक गणित कोलमडले होते. यातच, सीएनजी दरातही किलोमागे तीन रुपयांनी वाढ झाल्याने अधिकच फटका सहन करावा लागला. यामुळे रोजच्या इंधनाच्या खर्चाला वैतागलेल्या प्रशासनाकडून भाडेवाढीचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र, संचालक मंडळाने तो फेटाळून लावला.
पीएमपीच्या ताफ्यात 571 बसेस सीएनजीच्या, तर 800 पेक्षा जास्त डिझेलवर धावणाऱ्या आहेत. या बसेससाठी पीएमपीला सुमारे 38 हजार लीटर डिझेल प्रतीदिन खरेदी करावे लागते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला 74.26 रुपये प्रतीलिटर दराने डिझेल उपलब्ध होत होते. यात तीन टप्प्यांमध्ये मिळून 10 रुपये 94 पैशांची घट झाली असून आज 63.32 रुपये प्रतीलिटर दराने डिझेल उपलब्ध झाले आहे.
2 नोव्हेंबर रोजी डिझेलचा दर – 74.26 रु (लिटर)
2 डिसेंबर रोजी डिझेलचा दर – 63.32 रु (लिटर)
महिन्यभरापुर्वी डिझेलसाठी लागणारा दैनंदिन खर्च – 28 लाख 21 हजार 880
आज डिझेलसाठी लागणारा दैनंदिन खर्च – 24 लाख 06 हजार 160
पीएमपीला दैनंदिन लागणारे डिझेल – 38, 000 (लिटर)
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा