खोटी माहिती सादर केल्यास अनुदान रद्द

पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना : साहित्य खरेदी प्रस्ताव

पुणे – महाविद्यालय गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत विविध साहित्याच्या खरेदीकरिता अनुदान मिळविण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता 10 जानेवारीपर्यंत करावी. अनुदान लाटण्यासाठी खोटी माहिती सादर केल्यास मंजूर झालेले अनुदान रद्द करण्यात येईल, असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या योजनेअंतर्गत बिगर आदिवासी व आदिवासी विभागातील संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांना कार्यालयीन, शैक्षणिक व प्रयोगशाळा उपकरणे, क्रीडा साहित्य खरेदी, सायकल खरेदी यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी अनुदान वाटप करण्यात येत असते. यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्‍चित केली असून त्यानुसार महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असतात. बहुसंख्य महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, तपासणीत अनेक त्रूटी आढळून आल्या आहेत. अनेकांनी नियमात न बसणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी अनुदानाची मागणी केली आहे. तर, काहींनी आवश्‍यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. संबंधित महाविद्यालयांना त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मुदत दिली आहे, असे विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाच्या उपकुलसचिवांनी महाविद्यालयांच्या प्राचार्य, संचालकांना बजाविलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

लॅपटॉप, कॅमेरा खरेदीस मान्यता नाही
बहुसंख्य महाविद्यालयांनी प्रामुख्याने एलसीडी प्रोजेक्‍टर व स्क्रीन, प्रिंटर, हेड फोन्स, झेरॉक्‍स मशीन, लॅपटॉप, डिजीटल कॅमेरे, बायोमेट्रीक मशीन, माइक सिस्टीम, वॉटप कुलर, वॉटर प्युरीफायर यासारख्या साहित्याच्या खरेदीलाच प्राधान्य दिले आहे. 5 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या साहित्याची खरेदी करण्यात येऊ नये. लॅपटॉप, कॅमेरा, व्हीडीओ कॅमेरा या साहित्याच्या खरेदीस मान्यता देण्यात येणार नाही, असे विद्यापीठाकडून स्पष्ट केले आहे.

हिशोब सादर न करणारे राहणार वंचित
काही महाविद्यालयांनी 2016-17 पूर्वी उचल रक्‍कम घेतली असून त्याच्या खर्चाचे हिशोब अद्यापपर्यंत सादर केलेले नाहीत. त्यांनी त्वरीत हिशोब सादर करावेत अन्यथा नवीन अनुदान मंजूर करण्यात येणार नाही. मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन न केल्यास संबंधित महाविद्यालयांचे अनुदान रद्द करण्याचे अधिकार विद्यापीठ कार्यालयाने राखून ठेवले आहेत. चालू शैक्षणिक वर्षांत काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश काहीच झाले नाहीत तर काहींनी महाविद्यालये बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यांना अनुदानाचा लाभ घेता येणार नाही, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)