खेळाडूचा जीवनात कधीही पराभव नसतो

नगर – खेळाडूचा जीवनात कधीही पराभव होत नसतो. खेळाडू वृत्तीने जीवनात आलेल्या विविध संकटांशी सामना करण्याचे बळ मिळते. यश-अपयश हे नाण्याच्या दोन बाजू असून यशाने आत्मविश्‍वास बळावतो, तर अपयशाने पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द निर्माण होत असल्याची भावना माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्‍त करून विद्यार्थीदशेत क्रिकेट खेळताना चांगले मैदान उपलब्ध झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

जिल्हा कराटे असोसिएशन व आयडियल ग्रुपच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी माजी महापौर कळमकर यांची निवड झाली असता त्यांचा सावेडी येथील आनंद विद्यालयात सत्कार करण्यात आला; खेळाडूंशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक निखिल वारे, डॉ. प्रीतम भुजबळ, घनश्‍याम सानप, अमोल काजळे, जगदीश देशमुख, शिव घेगडे, प्रशांत पालवे, वैभव आव्हाड, अतुल काजळे, धर्मनाथ घोरपडे, प्रसाद सामलेटी, अक्षय चौधरी, शुभम जोशी, स्नेहल तळेकर, युगांशी गवळी, आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळमकर पुढे म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यांसाठी विविध सोयीसुविधा प्राप्त झाल्या असून, त्यांना खेळात नैपुण्य दाखविण्यास वाव आहे. कराटे या खेळाला इंडियन ऑलिम्पिकची मान्यता मिळाली असून, या खेळाडूंना 5 टक्‍के आरक्षण मिळणार आहे. तसेच, सरकारी नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाहुण्यांचे स्वागत अमोल काजळे यांनी केले. प्रास्ताविकात घनश्‍याम सानप यांनी विविध स्तरावर खेळाडूंनी मिळविलेल्या प्रावीण्याचा आढावा घेतला. नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, कोपर्डी प्रकरणानंतर मुख्य प्रशिक्षक घनश्‍याम सानप यांनी जिल्ह्यातील मुलींसाठी कराटे प्रशिक्षणाचे धडे देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले. तसेच, त्यांना दुष्ट प्रवृत्तींशी सामना करण्याचे बळ दिले. अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडले आहेत. तर, अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)