खेलो इंडिया स्पर्धेत साडे बारा हजार खेळाडू होणार सहभागी

-18 क्रीडा प्रकारांचा समावेश
– केंद्रिय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

पुणे – केंद्र आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी येथे दि. 8 ते 20 जानेवारी दरम्यान होणार आहे, अशी माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्राच्या क्रीडा विभागाचे संदीप प्रधान, क्रीडा आयुक्‍त सुनील केंद्रेकर आणि सहसंचालक नरेंद्र सोपल उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या 18 खेळांच्या स्पर्धा, 17 वर्षाखालील आणि 21 वर्षाखालील मुले व मुली या गटात होणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशामधून भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू-संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू, सीबीएससी राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडू, असे सुमारे 12 हजार 500 खेळाडू, तांत्रिक अधिकारी आणि स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

या युथ गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्‍स, वेटलिफ्टिंग, ज्युदो, कुस्ती, बॅडमिंटन, ऍथलेटिक्‍स, शुटिंग, फुटबॉल, हॉकी, खो-खो, जलतरण, बॉक्‍सिंग, कबड्डी, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस आणि आर्चरी या खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून तब्बल 769 खेळाडू, 72 क्रीडा मार्गदर्शक तसेच व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. क्रीडांगणांच्या प्रवेशद्वारांना राज्यातील नामवंत क्रीडापटुंची नावे देण्यात येणार असून स्पोर्टस एक्‍स्पोच्या माध्यमातून खेळाचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी विशेष क्षेत्र राखीव ठेवण्यात येणार आहे.

फिटनेस व संतुलित आहार याबाबत मोफत मार्गदर्शन तसेच क्रीडामधील कौशल्य विकास व करियरच्या संधी यावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील विविध शाळातील खेळाडूंना विशेष निमंत्रित करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. या स्पर्धेचे उद्‌घाटन दि. 9 जानेवारी रोजी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी केंद्राने यापूर्वीच 14 कोटी रुपयांचा निधी दिला असून आणखीन निधीची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य शासन तसेच सीएसआरच्या माध्यमातून हा खर्च करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील 18 क्रीडाप्रकारांपैकी हॉकी या खेळाच्या स्पर्धा मुंबई येथे होणार असल्याचे ही तावडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)