खेडशी संबंधित रस्त्यांसाठी 3615 कोटींचा निधी मंजूर

आमदार सुरेश गोरे यांची माहिती
चाकण  -तळेगाव-चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून, हा रस्ता सहापदरी होणार आहे. या रस्त्यासाठी 1799 कोटी, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासाठी 950 कोटी व सरलगाव-भीमाशंकर-वाडा-खेड या मार्गासाठी 966 कोटी असा एकूण 3615 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवीन महामार्गांमुळे दळणवळण सुविधा वाढणार असून त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पावसाळी अधिवेशन, पंचायत समिती पोटनिवडणूक, महामार्ग सद्यस्थिती व पत्रकारांचे प्रश्न यावर सविस्तर माहिती दिली.
पुढे ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून ऑनलाईन कर्जमाफी प्रक्रिया किचकट असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून, दर सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे हे विधान भवन कार्यालयात खास या कामासाठी उपलब्ध राहणार असून पात्र शेतकऱ्यांचे सुयोग्य पुनर्वसन करणार आहेत.
येलवाडी गावच्या हद्दीत संत तुकाराम अध्यासन केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांना सादर केला आहे. भामचंद्रनगर परिसराचा देहू-आळंदी विकास आराखड्यात समावेश करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अधिवेशन काळात उपस्थित केलेल्या कामांच्या यशस्वी पाठपुराव्यासाठी मुंबईत पूर्णवेळ स्वीय सहाय्यक नेमल्याचे त्यांनी नमूद केले. पंचायत समिती पोटनिवडणुकीतील यशाचे श्रेय त्यांनी खेड तालुक्‍यातील शिवसैनिकांच्या संघटनशक्तीला दिले. पिंपरी बुद्रुक गणातील सर्वसामान्य मतदार आर्थिक प्रलोभनांना बळी न पडल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्थानिक प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी रस्तेविकास, ठाकरवस्त्यांवरील पाणी योजना, आदिवासी समाजातील कुटुंबांना शासकीय योजनांची उपलब्धता यांपासून दूर ठेवले असा आरोप त्यांनी केला. पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे पंचायत समितीत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाल्याने यापुढे विकासकामांची घोडदौड वेगाने होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, सेना नेते अरुण गिरे, ग्राहक संरक्षण सेनेचे उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव, उपतालुका प्रमुख किरण गवारी, युवासेना नेते विशाल पोतले, सामाजिक कार्यकर्ते बिपिन रासकर, मनोहर गोरे हे उपस्थित होते. खेड तालुका प्रेस क्‍लबचे अध्यक्ष हरिदास कड यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव अमित टाकळकर यांनी स्वागत केले, तर सचिव हनुमंत देवकर यांनी आभार व्यक्त केले.
चौकट ः पत्रकारांच्या आंदोलनास पाठींबा
पत्रकारांनी निर्भीड व निरपेक्ष भावनेने पत्रकारिता करावी तसेच संवेदनशील विषयात बारकावे तपासावेत, जेणेकरून कोणाची प्रतिमा मलीन होणार नाही, अशी अपेक्षा आमदार गोरे यांनी व्यक्त केली. पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 18 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या धरणे आंदोलनास त्यांनी पाठींबा जाहीर केला. सर्व सदस्यांना मराठी पत्रकार परिषद (मुंबई) संलग्नित पुणे जिल्हा पत्रकार संघाचे ओळखपत्र आमदार गोरेंच्या हस्ते देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)