खेडमध्ये धनुष्याला कमळाची साथ मिळणार?

– रोहन मुजूमदार

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा मतदारासंघ म्हणून खेड विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. तसा हा मतदारसंघ आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे. या मतदारसंघाने गेल्या तीन टर्ममध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरभरून मते दिली आहेत. तर त्यांना चौकार लगावण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीने माजी शिवसैनिक तथा अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊ केली आहे. दरम्यान, खेड विधानसभा मतदारसंघात भाजपने चांगलीच पाळेमुळे रोवली आहेत. युती झाली असली तरी येथे भाजप-शिवसेनेचे “प्रेम’ सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे खासदार आढळराव यांना चौकार लगावण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने खासदार आढळरावांच्या पाठीशी उभे राहणार का, हे काही दिवसांत स्पष्ट होईलच. येथे शिवसेनेबाबत थोडी नाराजी पसरली असून ती दूर करण्यात आढळरावांना यश येणार की, याचा फायदा डॉ. कोल्हेंना होणार हे येणारा काळच ठरवेल.

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला गेला आहे. तर खेड विधानसभेतही शिवसेना आणि राष्ट्रवादीत “टफ फाईट’ रंगत आली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत माजी शिवसैनिक व या मतदारसंघाचा अभ्यास असलेले डॉ. कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन एक “कांटे की टक्कर’ लढत निर्माण केली आहे. त्यामुळे आढळराव यांना भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने साथ दिली तर त्यांना चौकार लगावणे सुलभ जाणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. या मतदारसंघातील निवडणूक वाहतूक कोंडी, माघारी गेलेले प्रकल्प, पाणीप्रश्‍न, बैलगाडा शर्यत आदी प्रश्‍नांवर रंगणार असून या प्रश्‍नांना आढळराव कसे टोलावतात व कोल्हे आणखी कोणत्या आश्‍वासनांचा पाऊस पाडतात, हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरेल.

दरम्यान, खेड विधानसभा मतदासंघात गेल्या काही वर्षांत भाजपनेही आपली पाळेमुळे घट्ट केली आहे. युतीमुळे शिवसेना उमेदवारास भाजचेही बळ मिळणार आहे. मात्र, येथील भाजपचे कार्यकर्ते खासदार आढळराव पाटील यांना पूर्ण ताकदीने मदत करणार की तटस्थांची भूमिका बजावणार हे येणारा काळ ठरवेल. कारण, मुंबईत युतीच्या नेत्यांमध्ये दिलजमाई झाली असली तरी “ग्रासरुट’च्या कार्यकर्त्यांना ती मान्य असतेच असे नाही; परंतु एकनिष्ठ कार्यकर्त्यांस पक्षनिष्ठेपुढे काही दिसत नसल्याने तो मजबुरीने का होईना पक्ष आदेश पाळतो. अशीच काहीशी परिस्थिती खेड विधानसभा मतदारसंघात आहे. तर आमदारकीसाठी हा मतदारसंघ भाजपने घ्यावा अशी कार्यकर्त्यांची सुप्त इच्छा असली तरी त्यांनी कधी बोलून दखवलेली नाही. त्यामुळे ही सुप्त इच्छा मनात ठेवून ते खासदार आढळराव पाटील यांना पूर्ण ताकदीने मदत करणार की दिखावा म्हणून “आप आगे बढो…’ असे म्हणणार हे आगामी काळच ठरवणार आहे.

गणित-प्रश्‍न मांडूनच प्रचार करावा लागणार
मध्यंतरी युती तुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजगुरूनगरात आले असता एकाही भाजपच्या पदाधिकाऱ्याला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. तसेच गेल्या 15 वर्षांत खासदार आढळराव यांच्या कोणत्याही कार्यक्रमात स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्याला स्थान मिळाल्याचे क्वचितच दिसले आहे. त्यामुळे चौकार लगावण्यास इच्छुक असलेल्या खासदार आढळराव पाटील यांना भाजप कार्यकर्ते किती साथ देतील याचे गणित मांडून खासदार आढळरावांना तर खेड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करून डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचार करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)