खेडमध्ये घरगुती विज ग्राहकांना आर्थिक “शॉक’

-मीटर रिडींग न घेता आले बिल : शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांनाच घेराव
– बिल न भरणाऱ्यांचे विज पुरवठा तोडण्याचे सत्र सुरू
राजगुरुनगर – खेड तालुक्‍यातील काही नागरिकांना घरगुती वापराच्या विजबिलांमध्ये मोठा घोळ दिसून आला आहे. वाढीव बिले आल्यामुळे नागरिकांना आर्थिक शॉक बसला आहे. ही विजबिले दुरुस्तीसाठी महावितरणमध्ये ग्राहक गेले तरी त्यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकडून योग्य वागणूक दिली जात नाही. तसेच यातून काहींची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली जाते. याला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत याचा जाब विचारला.
खेड तालुक्‍यातील घरगुती वीज वापरणाऱ्या नागरिकांना मीटर रीडिंग न घेताच लाखो रुपयांचे वीज बिले आली आहेत. वीज बिले न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची वीज पुरवठा तोडण्याचे सत्र वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. मीटर रीडिंग न घेतात आलेली लाखो रुपयाची वीज बिले भरायची कशी? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकाला 1 लाखापासून 3 लाख रुपयापर्यंत वीज बिले आली आहेत. भरमसाठ वीज बिले आलेले नागरिक आदिवासी भागातील आहेत. या भागात महिन्यातून जेमतेम दहा ते पंधरा दिवस वीज असते. शिवाय, ती सिंगल फेज असते. तरीही अचानक लाखो रुपयांची विज बिले आल्याने ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले आहेत. महिन्याला जेमतेम 30 ते 50 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना तब्बल 1000-1200 महिन्याला युनिट वापरल्याची विजबिले आली आहेत. लाखो रुपयांची वीज बिले पाहून शेतकरी हतबल झाला आहे.
ही वाढीव विजबिले दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना राजगुरुनगर येथील महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. यातही अधिकारी जाग्यावर असेल असे नाही. येथे आल्यानंतर कर्मचारी, ग्राहकांची उद्धट वागत आहेत. नागरिकांबरोबर उद्धट भाषा वापरून त्यांना पळवून लावत आहे. दूरवरून आलेल्या नागरिकांनी आणलेले वीज मीटर रीडिंगबाबत आक्षेप घेत वायरमन कडूनच ते लिहून आणि त्यांची त्यावर सही घेवून येण्याचा आग्रह करून त्रास दिला जात आहे. ग्रामीण भागात असलेला वायरमन कधी भेट क्‍वचित होते. वीज अनेक दिवस खंडित असते. महिनाभरात केवळ 10 ते 15 दिवस वीज पुरवठा असल्याने नागरिक अगोदर हैराण असताना घरगुती वापराच्या विजेची बिले मात्र 5 अंकी असल्याने ग्रामीण भागातील वीज ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे,असे आढळत आहे.
वाढीव विजबिले दुरुस्त करण्यासाठी वीज ग्राहकांना राजगुरुनगर, चाकण येथे यावे लागते. मात्र, येथे यातील काही अधिकारी-कर्मचारी ग्राहकांशी उद्धट भाषा वापरून त्यांना पिटाळून लावत आहे. यामुळे वैतागलेल्या ग्राहकांचा सोमवारी (दि.28) राजगुरूनगरच्या महावितरण कार्यालयात उद्रेक झाला. यावेळी ग्राहकांचे म्हणणे ऐकूण घेण्याऐवजी त्यांच्यशी महावितरणचे कर्मचारी हुज्जत घालत होते. या प्रकाराला वैतागून वीज ग्राहकांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मनीष कडू यांना बोलाविण्यात आले. कडू आल्यानंतर नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचत त्यांना घेराव घातला. यावेळी अनेक नागरिक आक्रमक झाले होते. हजारो लाखो रुपयाची वीज बिले भरणार कोठून? मीटरचे रीडिंग न घेताच अंदाजे युनिट टाकून भरमसाठ रकमेची वीज बिले का दिली जातात? सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक का थांबत नाही? वीज चोरीचा अधिभार सर्वसामान्य नागरिकांवर का टाकला जातो? अशा प्रश्‍नांचा ग्राहकांनी भडीमार केला.

  • ग्राहकांना योग्य वागणूक द्या
    शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, भाजपचे संपर्क प्रमुख सचिन लांडगे, तालुका विभागप्रमुख महेंद्र घोलप, कैलास गोपाळे, वाहतूक संघटनेचे सुनील टाकळकर यांच्यासह शिवसेनेचे काही कार्यकर्ते महावितरण कार्यालयात आल्यानंतर एकच हल्लाबोल झाला. ग्राहकांची बाजू घेत शिवसेना स्टाईलने वीज मंडळाचे अधिकारी मनीष कडू यांना घेराव घातला. मीटरचे रीडिंग न घेताच वाढीव वीज बिले अनेक दिवसांपासून वीजबिले पाठवली जातात. मीटर रीडिंग घेणारी खाजगी ठेकेदारी बंद करा, प्रत्यक्षात वीज युनिट कमी आणि अंदाजे युनिटची बिले ग्राहकांना देवू नका, वीज बिले दुरुस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही. वीज बिले दुरुस्त करण्यासाठी मंडळनुसार अधिकारी ठेवा. अन्यथा, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यापूर्वी मला हजार रुपयांच्या आत वीज बिल येत होते. आता या महिन्यात 1 लाख 47 हजार रुपयांचे वीज बिल आले आहे. आमच्या गावामध्ये अनेक नागरिकांना अशी बिले आली आहेत. त्यामुळे एवढ्या रकमेची बिले आल्याने ती भरण्यासाठी जीव द्यायचा का? असा सवाल उपस्थित केला. मीटर रिडींग घेणारी संस्था चोर आहे. महावितरण खाजगीकरण करून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक केली आहे.
– संपत राक्षे, वीजग्राहक

शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा. अंदाजे वीज बिले काढून भरमसाठ रकमेची बिले देण्याचे काम बंद करा. वाद घालणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्या अन्यथा, तीव्र आंदोलन केले जाईल.
-गणेश सांडभोर, जिल्हा समन्वयक, शिवसेना खेड.

  • वाढीव बिलाचा प्रकार थांबवा अन्यथा, आंदोलन
    भाजपचे तालुकाअध्यक्ष अतुल देशमुख यांनी शेतकरी आणि नगरीकांना जादा वीज बिले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी वीज मंत्र्यांकडे केली आहे. मीटर रीडिंग न घेताच अनागोंदी युनिटचे आकडे टाकून सर्वसामान्य नागरिकांकडून जादा आकाराने वीज बिले वसूल केली जात आहेत. हा प्रकार तत्काळ न थांबविल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)