खेडच्या पश्‍चिम भागात धबधबे खळखळले

पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने पर्यटक भोरगिरी, भीमाशंकर परिसरात ग्रुपने दाखल : परिसर हिरवाईने नटला
राजगुरुनगर – खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील पर्यटकांना सुरक्षित असलेले धबधबे खळखळत असल्याने त्याचा आनंद घेण्यासाठी आणि वर्षाविहार करण्यासाठी अनेक शहरी पर्यटक भोरगिरी, भीमाशंकर परिसरात दाखल झाले आहे आहे. यात शहरातील मोठ-मोठ्या ग्रुपचा सहभाग.


निसर्गाचा अदभूत असा चमत्कार असलेल्या भोरगिरी भीमाशंकराचा परिसर हिरवाईने नटला आहे. श्रावण सरू झाला की या परिसरात पर्यटकांची मोठी ये-जा असते भोरगिरी येथील उंच धबधबे, गुप्त भीमाशंकर, मुख्य ठाणे कोटेश्‍वर मंदिर आणि भोरगड असे निसर्ग सौंदर्य असलेल्या भोरगिरी परिसरात दाटधुके मनाला भुरळ घालते. त्यामुळे या महिन्यात पर्यटकांची संख्या याभागात वाढत आहे. भोरगिरी भीमाशंकर हा सात किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा आनंद देत आहे.
पुणे-मुंबई आणि राज्यासह देशातील विविध भागातून येथे अनेक पर्यटक आणि भेटी देतात निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागात मनसोक्‍त व तितकेच भयमुक्‍त वर्षाविहार करण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. यावर्षी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असा हा भाग असल्याने येथील धबधबे, भीमा नदी आणि भीमाशंकर अभयारण्य विविध रंगीबेरंगी पशु-पक्षी, फुले, झाडे याचा आनंद घेताना दिसतात. भोरगिरी येथील भोरगडावरील कोरीव लेणी, भोरगिरी येथील एजॉय पॉइन्ट, हरामीचा धबधबा, मंदोशीचा उंच धबधबा, भिवेगावाचा गोल्डन धबधबा, धुवोलीचा नेकलेस धबधबा, येळवळी गावातील उंच व फेसाळत वाहणारा धबधबा, भोरगिरी गावातील गर्द दाट धुके, धुक्‍यात बरसणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरी याचा मनमुराद आनंद पर्यटक घेताहेत. गावात आलेल्या पर्यटकांची भोरगिरी ग्रामस्थांकडून काळजी घेतली जात आहेत. पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांना नाष्टा, जेवण आणि राहण्याची आवश्‍यक सोय आणि परिसरातील निसर्गरम्य धबधबे, स्थळांची माहिती पुरवीत आहेत. यातूनच या गावातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.


येळवळी गावाचे युवक सुभाष डोळस यांनी सांगितले कि, भोरगिरी भीमाशंकर परिसरात शहरातील मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. मात्र, काही पर्यटकांकडून या परिसराचे प्लॅस्टिकचा कचरा दारूच्या बाटल्या फेकून विद्रुपीकरण केले जात आहे. त्याचा परिणाम येथील पर्यावरणावर होत आहे. सर्वाधिक प्लॅस्टिक कचरा भीमाशंकर येथे होत असल्याने पर्यटकांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे. भोरगिरी, भीमाशंकर ग्रामविकास समितीच्या माध्यमातून प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृती केली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी कचराकुंड्या उपलब्ध करून घ्याव्यात.

  • मद्य प्राशन करणाऱ्यांचा धुमाकुळ
    परिसरात आलेल्या काही पर्यटकबरोबर आणलेली दारू पीत असल्याने आणि त्याच्या बाटल्या फोडून शेतकऱ्यांच्या शेतात वाटेत टाकत असल्याने शेतकऱ्यांना आणि येथील अभयारण्यातील पशु-पक्षांना धोक्‍याचे ठरत आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दारूच्या बाटल्यांच्या काचा लागल्याने ते अनेकदा जखमी होत आहेत. याबरोबरच येथे आलेले मद्यधुंद तरुण रस्त्याने जाताना वाहने रस्त्यात उभे करून कपडे काढून नाचत इतर प्रवाशांची, पर्यटकांची अडवणूक करतात. या परिसरात पोलीस बंदोबस्त श्रावणात या परिसारात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत मात्र, याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने अशा मद्यधुंद तरुणाचे फावत आहे.

शहरातील मोठ्या संख्येने पर्यटक भोरगिरी, भिवेगाव, येळवळी आणि भीमाशंकर या परिसरात येतात. पर्यटकांना अत्यंत सुरक्षित असा हा भाग आहे. धबधबे, अभयारण्यातील पशु-पक्षी, गर्द दाट धुके, हिरवाईने नटलेला परिसर यामुळे पर्यटक या भागाला आता पसंती देत आहेत. पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असून येथील पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांनी प्लॅस्टिक वापराबाबत काळजी घेणे अपेक्षित आहे.
-अर्चना वनघरे, सरपंच, भोरगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)