खेडच्या पश्‍चिम भागातील 12 गावे अंधारात

आठ दिवसांपासून बत्ती गुल : जलवाहिनीच्या कामासाठी खोदाईत वीज वाहक तारा तुटल्या

महाळुंगे इंगळे- खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील आसखेड फाटा (ता. खेड) येथे पुण्याला नेण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना जमिनी खालून नेलेली वीजवाहक तार अचानक तुटल्याने 12 गावांची बत्ती गुल झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून हा परिसर अंधारात आहे. त्यामुळे विविध गावच्या पाणी योजना बंद पडल्या असून, पिके जळण्याच्या मार्गावर असल्याने जलवाहिनीचे काम बंद पाडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
जलवाहिनी खोदाई करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही केबल तुटली असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. आसखेड खुर्द फाटा परिसरात पुणे शहराला पाणी जाणाऱ्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. याच खोदाईच्या ठिकाणी खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील गावांना वीज नेण्यासाठी 22 केव्ही क्षमतेची केबल गाडून नेली आहे;परंतु या ठिकाणी खोदाई सुरू असताना ही केबल तुटली असल्याने बहुतांश गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वीज वाहिनीद्वारे आसखेड खुर्द, बुद्रुक, कोरेगाव खुर्द, बुद्रुक, शेलू, कुरकुंडी आदि गावांचा काही भाग, कोयेचा काही भाग, धामणे, थोपटवाडी आदी गावांना वीज पुरवठा केला जात आहे; परंतु केबल तुटल्याने ही गावे गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहे. वीज नसल्याने अनेक गावच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. तर नदीपात्रात पाणी असून, ते विजेअभावी उपसता येत नसल्यामुळे पिके अक्षरशः जळण्याच्या मार्गावर आली आहेत. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आसखेड फाटा येथे धाव घेतली आणि वीज केबल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी खेड पंचायत समितीचे सदस्य चांगदेव शिवेकर, योगेश पडवळ, माऊली लिंभोरे, गोरख लिंभोरे, पांडुरंग गाडे, ज्ञानेश्‍वर गाडे, संभाजी पडवळ, रंगनाथ सोंडेकर, शांताराम तरडे, चंद्रकांत सोंडेकर, दिलीप पडवळ, संभाजी पडवळ आदि उपस्थित होते.

  • संबंधित ठेकेदाराला याबाबत लेखी पत्र दिले आहे. येत्या चार दिवसांमध्ये नुकसान झालेली जवळपास 300 मीटर केबल बदलली नाही, तर वरिष्ठांच्या सूचने नुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या दुसरीकडून पुरवठा देण्याचे काम सुरू आहे. पण त्यासाठी दाब कमी पडत आहे.
    – शिल्पा ढेपे, सहायक अभियंता, महावितरण
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)